सुमारे वीस-एक वर्षांपूर्वी, एका चुकीमुळे माझी नोकरी जाऊ शकली असती. त्यावेळी मी एका आंतरराष्ट्रीय बीपीओमध्ये नोकरी करत होते, जो विविध उद्देशांसाठी अमेरिकेन लोकांच्या माहिती पडताळणीची सेवा देत असे. त्या ठिकाणी माहिती पडताळताना काही नियमही पाळावे लागत. त्यात एक असा नियम होता कि एखाद्या व्यक्तीने ज्या ठिकाणी अजिबात संपर्क साधू नका किंवा एका विशिष्ट तारखेनंतर संपर्क साधा अशी सूचना दिलेली असेल, तर ती तंतोतंत पाळली न गेल्यामुळे जर त्या व्यक्तीची नोकरी गेली तर ह्या बीपीओ कंपनीला मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो. शिवाय माहिती पडताळणी करणाऱ्या त्या एजंटलाही दंड भरावा लागून, कामावरून काढलं जाऊ शकतं. कंपनीने तसा करारच केलेला होता एजंट्सशी.
माझ्या हातून नेमकी तीच चूक घडली होती. एका व्यक्तीच्या नोकरीच्या ठिकाणी माहिती विचारून मी त्याच्या नोकरीला धोका निर्माण करून ठेवला होता. माझा तो कॉल संपला आणि दहाच मिनिटांत मला व्हाईस प्रेसिडेंटच्या केबिनमध्ये बोलावण्यात आलं. तिथे आमचा फ्लोअर मॅनेजर, माझा टी.एल. जॉर्जी आणि इतर टीम्सचे टी.एल. सुद्धा जमले होते. मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहात होते. आमच्या कंपनीच्या अमेरीकेतील कार्यालयातून फोन आला होता आणि त्यांनी माझ्याकडून ती चूक घडल्याचं कळवलं होतं. केबिनमध्ये सगळेच प्रचंड संतापलेले होते. त्यांनी कारण सांगितल्यावर धरणीकंप झाल्यासारखं वाटलं मला. माझ्या चुकीचा परिणाम काय ते मला माहित होतं.
आमची व्हाईस प्रेसिडेंट सोडली तर बाकीच्यांनी जमेल तेवढं तोंडसुख घेतलं. ती सुद्धा बोलली पण तिचा स्वर बराच मवाळ होता पण माझं त्या कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष नव्हतं. एकच प्रश्न माझ्या मेंदूला भुंग्यासारखा कुरतडत होता, ‘ही चूक माझ्या हातून कशी काय घडली? एवढी लाल रंगात सूचना लिहिलेली असते, तरी माझं लक्ष कसं गेलं नसेल?...Debt collection मध्ये मी एकदाही मिनी मिरांडा विसरले नाही आणि इथे स्क्रिनवर दिसत असूनही...’
तेवढ्यात जॉर्जीचे शब्द कर्कश्श स्वरात माझ्या कानावर आदळले, "एवढी शांत कशी काय राहू शकतेस? तुला माहितीये का तू काय केलंस? कंपनी तुझ्या वतीने नुकसान भरपाई करणार नाही. तूच करायचीस." बाकीचे जमलेले त्याला आवरत होते पण तो भयानक चिडला होता. त्याचा आवाज बंद केबिनच्या बाहेर जात होता. तो काय सांगत होता ते मला लक्षात आलं. मी नुकसान भरपाई करायची म्हणजे मला माझ्या त्या काळच्या पगारात पुढली कितीतरी वर्षं फेडता आलं नसतं इतकं कर्ज घेऊन ती रक्कम ह्या कंपनीला द्यायची.
माझी चूक मला मान्य होती. अचानक नोकरी जाण्याचा अनुभव माझा घेऊन झालेला होता. माझ्यामुळे कोणाची नोकरी जाणार असेल तर कर्जबाजारी होणंही मी मनोमन मान्य केलं होतं. अश्या वेळेस आपल्यालाही हक्क असतात हे आठवत नाही. डोकंच चालत नाही. दुसऱ्या दिवशी मॅनेजर "नुकसान भरपाईची" औपचारिक प्रक्रिया सुरू करणार होता. पण बहुतेक मी शांतपणे चूक मान्य करतेय, वाद घालत नाही, रडत-बिडत नाही हे जॉर्जीला सहनच होत नव्हतं. तो आणखी दोन-तीन वाक्यं मला उद्देशून बोलला आणि मग "चालती हो" म्हणाला.
मी केबिनच्या बाहेर आले. बरेच जण माझ्या तोंडाकडे पाहात होते. माझ्या मागोमाग फ्लोअर मॅनेजर आणि जॉर्जीदेखील बाहेर आला. त्यांनी मला तिथेच उभं राहाण्याची खूण केली. बाहेर फ्लोअरवर किमान शंभर-दीडशे लोक काम करत होते. त्यातले १०-२० जणच कॉलवर नव्हते. मॅनेजरने सर्वांना उद्देशून घडलेला प्रसंग सांगितला. शेवटी असंही म्हणाला, "हिच्यापासून तुम्ही उदाहरण घ्या. लक्षपूर्वक काम करा इ. इ." मग त्यांनी मला माझं सर्व सामान उचलून निघून जायला सांगितलं. माझा एजंट कोडदेखील ब्लॉक करण्यात आला जेणेकरून मी तो कॉन्टॅक्ट्सचा इंटरफेस उघडू नये. दुसऱ्या दिवशी त्यांचा वकील माझ्याशी संपर्क साधणार होता म्हणे.
मला अजूनही लक्षात येत नव्हतं कि ही चूक माझ्या हातून कशी काय घडली? भितीपेक्षाही मला कर्जाच्या कल्पनेने प्रचंड दडपण आलं होतं. तिथून निघण्यापूर्वी सिस्टिम बंद करावी म्हणून मी कॉम्प्युटरसमोर खुर्चीत बसले. तिथे अशी कार्यपद्धती होती कि तुम्ही कॉलवर एखाद्या कॉन्टॅक्टच्या माहितीची यशस्वीपणे पडताळणी केलीत तर तुमचा एजंट कोड टाकून त्या कॉन्टॅक्टचा स्क्रिनशॉट घ्यायचा आणि पेंटब्रशच्या माध्यमातून सेव्ह करून ठेवायचा. दिवसाच्या शेवटी हे सर्व स्क्रिनशॉट्स पुरावा म्हणून आपल्या टी.एल.ला इमेल करायचे. त्यासाठी सर्वांना एक-एक जीमेल ID तयार करून देण्यात आली होती. पण मला एक वाईट खोड होती - मला माझ्या सर्वच यशस्वी-अयशस्वी कॉल्सचा स्क्रिनशॉट घेण्याची सवय लागली होती. त्याचा उपयोग कसा करायचा हे मी आधीच्या बीपीओमध्ये काम करून शिकले होते. प्रोसीजरप्रमाणे यशस्वी माहिती पडताळणीचे स्क्रिनशॉट्स जॉर्जीला इमेल करण्यासाठी मी माझं स्क्रिनशॉट्सचं फोल्डर उघडलं. माझा सर्वात शेवटचा कॉल "तोच" होता. अयशस्वी असला तरी त्याचाही माझ्या सवयीनुसार स्क्रिनशॉट घेऊन ठेवला होता. ती इमेज मी उघडली आणि माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही! तो फक्त एक स्क्रिनशॉट नव्हता, तो होता माझ्या निर्दोषत्त्वाचा एकमेव पुरावा!
इंटरफेसच्या त्या स्क्रिनशॉटमध्ये माझा एजंट कोड स्पष्ट दिसत होताच पण त्या कॉन्टॅक्टच्या बाजूला लाल रंगात जी सूचना दिसायला हवी होती, ती तिथे नव्हतीच. ह्याचाच अर्थ मी लाल रंगातल्या सूचनेकडे दुर्लक्ष केलेलं नसून, ती सूचना तिथे नसल्यामुळेच त्या व्यक्तीच्या नोकरीच्या ठिकाणी माहिती विचारणं योग्य आहे असं गृहित धरलं. डोक्यावरचा प्रचंड भार अचानक निघून गेल्यासारखं वाटलं. मला धावतपळत जाऊन ती बातमी मॅनेजरला सांगण्याची इच्छा होत होती पण मी भावनांना आवर घातला. सर्वात आधी मी त्या फोल्डरमधले सगळे स्क्रिनशॉट्स माझ्या वैयक्तिक इमेलवर पाठवले. Sent फोल्डरही क्लिन केलं. मग VP च्या केबिनमध्ये गेले. तिला बाहेर येऊन तो स्क्रिनशॉट बघण्याची विनंती केली. तिने पाहिल्यानंतर मॅनेजर आणि टी.एल. ने देखील तो पाहिला. त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं. मग मला तिथेच बसवून ते सगळे VP च्या केबिनमध्ये गेले. थोड्या वेळाने मला बोलावून मी तो कॉल चालू असताना काय, काय केलं हे विचारलं. मग जायला सांगितलं. थोड्या वेळाने बाहेर येऊन इतकंच सांगितलं कि माझी नोकरी गेलेली नाही. दुसऱ्या दिवशी ते सगळ्याचं स्पष्टीकरण देणार होते.
त्या दिवशी सकाळी काम संपवून बाहेर पडताना माझ्यासोबत ड्रॉपला असणारे माझे सहकारी कोणीही माझ्याशी बोलत नव्हते. मला टाळूनच त्यांच्या गप्पा सुरू होत्या. घरी गेल्यावर मला नेमक्या कोणत्या कारणामुळे झोप लागली नाही हे सांगता येणार नाही पण तासभर प्रयत्न करूनही झोप लागली नाही म्हणून बाहेर पडले. उपवनला गेले. सकाळी तिथे कोणी नसायचं. Lake view point ला उभं राहिलं कि डोळ्यांसमोर संपूर्ण तळं दिसतं. मागे गर्द झाडी आणि डोंगर. तिथूनच बिबळे खाली उतरायचे पाणी प्यायला. पण मला तेही लक्षात नव्हतं. जोरात ओरडावंसं वाटलं, त्या क्षणी मनात विचार आला - जर माझ्या हातून खरंच चूक घडलेली असती तर मी अश्या प्रकारे ओरडून व्यक्त होणं योग्य ठरलं असतं का? माझ्यावर अन्याय झाला होता का, तर नाही. मग मला कसला त्रास होतोय? जॉर्जी मला जे काही अपमानास्पद बोलला त्याचा? तर नाही. त्याची पद्धत चुकीची होती पण तो माझा टी.एल. होता. कदाचित त्याचीही जबाबदारी असल्यामुळे तो घाबरला असावा. मग कसला त्रास होतोय? - आपली चूक असो वा नसो, त्या कॉलमुळे कोणाची तरी नोकरी जाणारच होती. ह्या गोष्टीमुळे मला निर्दोष असूनही अपराधी असल्यासारखं वाटत होतं. कारण लक्षात आल्यावर मला आणखीन खिन्न वाटू लागलं.
त्याच अवस्थेत संध्याकाळी ऑफिसला गेले. तिथे गेल्या-गेल्या मला सांगण्यात आलं कि मला कामाचा अर्धा वेळ Performance Improvement Program अंतर्गत पुन्हा एक आठवडा कॉलवर कसे बोलावे, उच्चार कसे असावेत ह्याचं प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं. हे मला पूर्णत: अनपेक्षित होतं. माझी चूक नव्हतीच पण जरी असती तरी ती माझ्या चुकीच्या उच्चारांमुळे किंवा कसे बोलावे हे माहित नसल्यामुळे झालीच नव्हती. उलट VP ने दोन-तीन वेळा बाहेर येऊन माझ्या न्यूट्रल accent बद्दल माझी प्रशंसा केली होती. मग हे PIP चं प्रशिक्षण मी उगाच का घ्यायचं? पण गरजवंताला अक्कल नसते आणि मला नोकरीची गरज होती.
PIP ला जाण्यापूर्वी मला ज्या दोनच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, त्या डिनर ब्रेकनंतर सर्वांसमोर सांगितल्या गेल्या: पहिली गोष्ट म्हणजे माझ्या कॉलमुळे ज्या अमेरिकन व्यक्तीची नोकरी जाईल असं मला वाटलं होतं, त्या व्यक्तीने माझा कॉल जाण्याच्या तीन दिवस आधीच त्या नोकरीचा राजीनामा दिला होता. त्याचं कॉन्टॅक्ट आमच्याकडे महिनाभर आधी आल्यामुळे त्याची नवीन माहिती अपडेट झाली नव्हती. त्यामुळे अनावधानाने का होईना, ते पातक माझ्या हातून घडलंच नव्हतं. दुसरी गोष्ट फ्लोअर मॅनेजरने सांगितली ती म्हणजे, आदल्या दिवशी माझ्या हातून जी चूक घडली ती कॉम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टिम जुनी असल्यामुळे घडली होती. म्हणजे कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर असलेल्या कॉन्टॅक्टला कॉल करून झाला की इंटरफेसच्या Next बटणावर क्लिक केल्यानंतर नवीन कॉन्टॅक्ट समोर यायला हवं. पण माझ्या बाबतीत तसं न घडता, मी Next बटणावर क्लिक केल्यानंतर नवीन कॉन्टॅक्टचा वरचा अर्धा भाग आणि आधीच्या कॉन्टॅक्टचा खालचा भाग अश्या दोन स्क्रिन्स एकत्र झाल्या होत्या. आधीच्या कॉन्टक्टला लाल रंगाच्या सूचनेचा flag नव्हता, तोच भाग नवीन कॉन्टॅक्टसोबत राहिल्यामुळे मला त्या व्यक्तीच्या नोकरीच्या ठिकाणी माहिती विचारणं निषिद्ध असल्याची सूचनाच मिळाली नाही. माझे सर्व स्क्रिनशॉट्स अमेरिकेतील कार्यालयात तपासल्यानंतर त्यांनी हे अनुमान काढलं होतं पण अशी चूक भविष्यात पुन्हा होऊ नये म्हणून कालच्या त्या घटनेनंतर तिकडून अशी सूचना आली होती कि एक कॉल संपवून स्क्रिनवर Next बटणावर क्लिक केलं कि F5 म्हणजे रिफ्रेशचं बटण दाबावं. पूर्वी हे कोणी करत नव्हतं कारण तशी गरजच पडली नव्हती पण कालच्या त्या घटनेनंतर आमच्या ऑफिसमध्ये सर्वांना तसं करण्याचं आवाहन केलं गेलं.
ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यानंतर मला PIP ला जाण्यासाठी सांगण्यात आलं. माझा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच होता - कामाच्या ज्या भागात माझ्याकडून कधी चूक झालीच नव्हती त्या गोष्टींसाठी मी पुन्हा ट्रेनिंग का घ्यायचं? सॉफ्टवेअर-इंटरफेस ट्रेनिंग असतं तर गोष्ट वेगळी होती. कॉरीडॉरमधून चालताना विचार करत होते. हे सगळं कोणीतरी वैयक्तिक आकसातून तर करत नसेल ना? इंटरफेस वारंवार हॅंग होत असल्याचं जॉर्जीला सांगितल्यावर VP च्या केबिनसमोर असलेल्या सीटवर कोणीही बसायला तयार व्हायचं नाही तर नेमकी तीच सीट मला मुद्दाम ठरवून दिली गेली. VP ने माझे कॉल ऐकून माझी प्रशंसा केल्यावर दुसऱ्या दिवशी माझी जागा बदलण्यात आली. दिवाळीत आपल्या कुटुंबाला आपलं ऑफिस दाखवायचं असतं अशी तिथली पद्धत होती. त्याप्रमाणे मी आईबाबांना घेऊन गेले होते, त्या वेळेस नेमकी माझ्या कन्सोलसमोरची माझी नेमप्लेट गायब! "अरे, वो पता नही कहां गुम हो गयी" हे जॉर्जी धादांत खोटं बोलत होता पण अश्या गोष्टीचाही एक पूर्वानुभव घेतल्यामुळे मी ते फारसं मनावर घेतलं नव्हतं. एक गोष्ट खरी होती- माझ्याकडे आंतरराष्ट्रीय बीपीओमध्ये काम करण्याचा त्या आधीचा तगडा अनुभव होता. अमेरिकेतील सर्व राज्यांची भौगोलिक स्थाने, राजधान्या, डे-लाईट टाईम, पब्लिक हॉलिडेज्, त्यांचं श्वानप्रेम वगैरे माहिती मला तोंडपाठ होती. कॉलच्या दरम्यान स्क्रिनवर काम करत असताना डेड-एअर जाऊ नये म्हणून मी अमेरिकन व्यक्तींशी त्यांच्या कामाव्यतिरिक्त इतर सर्वसाधारण माहिती विचारून व्यवस्थित संवाद साधू शकत असे. स्पॅनिश फार यायचं नाही मात्र इतर एजंट ‘The client is Spanish' असा शेरा मारून पुढला कॉल करत असत पण मी कॉलवर क्लायंटला बांधून ठेवण्याइतपत अडखळत बोलून ‘कोणी इंग्लिश बोलणारं असेल तर कॉलवर बोलवा’ इतपत सांगू शकत असे. मग मी PIP ला का जावं?
दोन दिवस विचार केल्यानंतरही हे षडयंत्र की योगायोग हे मला कळेना पण एक बाब खटकली. VP चॅटर्जी, मॅनेजर बोस आणि टी.एल. जॉर्जी ह्यातील कोणीही मला sorry म्हणालं नाही. त्याच क्षणी निर्णय घेऊन टाकला. महिना संपायला अजून ४ दिवस बाकी होते. २ तारखेला पगार बॅंकेच्या खात्यात क्रेडिट व्हायचा. मी २ तारखेची वाट पहात होते. चार दिवसांनी PIP चं ट्रेनिंग संपलं. एक तारखेला जॉर्जीने एक तासभर सर्वांची मीटींग घेतली. त्यात काय करून घेतलं तर प्रत्येकाला समोर उभं करायचं आणि इतरांनी त्याच्याबद्दल आपलं मत मांडायचं. मला उभं केलं तेव्हा मला वाटलं होतं कि सगळे माझ्या फटकळपणाबद्दल बोलतील पण सगळ्यांचं मत असं पडलं कि मी माझ्या जगात असते, फार कोणात मिसळत नाही इ.इ. मला खरंच आश्चर्य वाटलं. सर्वात शेवटी जॉर्जीची इच्छा नसताना तो टी.एल. आहे म्हणून त्यालाही उभं करण्यात आलं. मला दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. आमच्या टीममधले जे एजंट कायम त्याच्या अवतीभोवती असायचे तेही त्याला खुनशी, व्हिशस म्हणाले, तोंडावर. जॉर्जीने शांतपणे ऐकून घेतलं. त्या दिवशी आमच्या टीममधली मुलं माझ्यासोबत ड्रॉपला असूनही माझ्याशी का बोलली नसतील हे मला लक्षात आलं.
२ तारखेला सॅलरी क्रेडिट झाल्यानंतर मी पुन्हा त्या कंपनीत पाय ठेवला नाही. त्या कंपनीकडून एक्स्पिरिअन्स लेटरही मला नको होतं. ३ तारखेला मी आलेले नाही हे पाहून आधी जॉर्जीने कॉल केला. मी घेतला नाही. मग मॅनेजर बोसचा कॉल आला. त्याने कारण विचारल्यावर त्याला सांगितलं, "माझ्या चुकीसाठी मला जी वागणूक मिळाली ती योग्यच होती पण माझी चूक नसून ती तांत्रिक त्रुटी आहे हे कळल्यानंतरही तुम्ही मला भलत्याच गोष्टीकरता PIP ला पाठवलंत." मॅनेजर म्हणाला, "अगं, ती फक्त एक औपचारीकता असते". मग त्याला म्हटलं, "ह्याचाच अर्थ घडलेल्या प्रकारात माझी चूक आहे हे तुम्हाला दाखवता येत नसल्याने माझा परफॉर्मन्स वाईट होता, असं माझ्या रेकॉर्डवर येण्यासाठी तुम्ही मला PIP पा पाठवलंत. Appraisal च्या वेळेस परफॉर्मन्स विचारात घेतला जातो. तुमच्या जागी नवीन मॅनेजर आला तर खरं काय घडलं हे त्याला माहितच असेल असं नाही." मग बोस "अरे, ऐसा कुछ नही होगा" असं म्हणाल्यावर त्याला एवढंच म्हटलं, "तसं असेल तर ज्या शंभर-दीडशे एजंट्सच्या समोर तुम्ही मला उभं करून माझं उदाहरण दिलंत, त्याच शंभर-दीडशे एजंट्सच्या समोर VP, तुम्ही आणि जॉर्जीने मला sorry म्हणण्याची औपचारिकता पाळा". ते ऐकल्यानंतर मात्र त्याचा हसरा मुखवटा गळून पडला. तो मला कंपनीसोबत केलेल्या कराराच्या धमक्या देऊ लागला. मग नाईलाजाने मला त्याला सांगावं लागलं की मीसुद्धा अमेरिकन कार्यालयाशी संपर्क साधू शकते आणि पुराव्यादाखल सर्व स्क्रिनशॉट्स माझ्याकडे सेव्ह करून ठेवलेले आहेत. मला PIP ला पाठवण्याचा निर्णय त्यांचा होता कि तुमचा हे देखील त्यांच्याकडून कळेलच. त्यावर ‘मी त्या कंपनीत नोकरी करणं deserve करत नाही’ असं म्हणाला तो.
खरंच होतं ते.