10 November 2013

संस्कृत आणि आपण

मी सातवीत असताना मला कळलं की पुढच्या वर्षीपासून म्हणजे आठवीपासून मला सेमी इंग्लिश अभ्यासक्रम असणार आहे. आमच्या शाळेत फक्त ’अ’ आणि ’ब’ तुकडीलाच सेमी इंग्लिशची सुविधा देण्यात आली होती. सेमी इंग्लिश म्हणजे गणित व विज्ञान हे विषय पूर्ण इंग्रजीतून, तर इतर विषय नेहमीप्रमाणेच मराठीतून शिकवले जाणार होते. पण माझ्या आजारपणामुळे माझे बरेच खाडे झाले होते. त्यामुळे पुढच्या वर्षी इंग्रजी माध्यमातून शिकवलेलं जर मला समजलं नाही तर मी नापास व्हायला नको म्हणून माझ्या आईने सरळ माझी ’अ’ तुकडी बदलून मला ’क’ तुकडीमधे प्रवेश घेऊन दिला. जेणेकरून आजारपणामुळे जरी शाळा बुडली तरी मराठीतून सर्व विषय समजून घेतल्याने परिक्षेत नापास होण्याची वेळ येणार नाही.

आईचा विचार त्या परिस्थितीमधे पूर्णत: बरोबर होता. पण त्यामुळे माझे काही तोटेदेखील झाले. उदा. ’अ’ तुकडीत असल्याने माझी सकाळची शाळा होती ती बदलून दुपारची झाली. माझे सर्व मित्रमैत्रीणी, मी ज्यांच्यासोबत बालवाडीपासून ते सातवीपर्यंत एकत्र शिकले होते, ते माझे सर्व सवंगडी एका वर्गात आणि मी निराळ्या वर्गात, त्यामुळे मला अगदी तुटल्यासारखं वाटू लागलं. या बरोबरच माझा आणखी एक मोठा तोटा झाला, तो म्हणजे संस्कृत शिकण्याची माझी संधी हुकली.

सेमी इंग्लिश प्रमाणेच, संस्कृतदेखील फक्त ’अ’ आणि ’ब’ तुकडीलाच शिकवण्यात येणार होतं, ते देखील पर्यायी भाषा म्हणून. ती माझी संधी हुकली आणि नंतर पुन्हा तशी संधी मला आजतागायत कधीच मिळाली नाही. अभ्यासामुळे, कॉलेजमुळे, मग नाटक आणि त्यानंतर नोकरीमुळे ती संधी माझ्यापर्यंत कधी आलीच नाही. मला राहून राहून या गोष्टीची खंत वाटायची.

आता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून संस्कृत भाषेच्या थोरवीची लेखमालिका ध्वनिमुद्रित करत असताना, मला अनेकांनी संस्कृत भाषेबद्दलचे बरेच संदर्भ, माहिती पाठवली. त्यात लंडनच्या एका शाळेचा व्हिडीओदेखील होता. या शाळेमधे संस्कृत ही अनिवार्य भाषा आहे. खूप कमाल वाटली मला. जी भाषा या देशाचं प्रतिनिधीत्व करते, जी भाषा या देशातील प्रत्येक व्यक्तीने आपली मातृभाषा म्हणुन सांगायला हवी, ती भाषा याच देशात मृत भाषा म्हणून घोषित केली जावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि ज्या इंग्लंडने आपल्यावर ३०० वर्षं सत्ता गाजवली, त्याच इंग्लंडच्या शाळेत मात्र या भाषेला मान देऊन त्यांच्या विद्यार्थ्यांना ती अनिवार्य म्हणून शिकण्यास भाग पाडलं जातं. हा केवढा प्रचंड विरोधाभास आहे.

काही दिवसांपूर्वी "अय्या" नामक चित्रपटामधील एका गाण्यात - "ड्रीमम्‌ वेकपम्‌ क्रिटीकल कंडिशनम्‌, अर्थम्‌ क्वेकपम्‌...." अशा ओळी ऐकल्या होत्या. हे गाणं गाणार्‍या गायिकेला "तू गाण्यामधील संस्कृत शब्द कसे काय सहजतेने गायलेस?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. गायिकेने त्यांना योग्य उत्तर दिलं पण हे आपल्याकडचं संस्कृतचं ज्ञान आहे. गाण्यातले सर्व इंग्रजी शब्द ऐकू येत असताना देखील त्याला "अम्‌" असा उच्चार लावला की झालं संस्कृत, इतकं सोपं वाटतं संस्कृत आपल्याकडे हल्ली.

संस्कृत भाषेबद्दल महत्त्वाचे या लेखमालेचं रेकॉर्डींग करताना मला संस्कृतबद्दल खूप महत्वाची माहिती कळली. अशी सुंदर, सगुण आणि मधुर भाषा आपल्या देशातच नाकारली जाते या आपल्या उदासीनतेचं दु:ख करावं की इतर देशांमधे संस्कृतचं महत्त्व ओळखून तिला मानाचं, आदराचं स्थान दिलं जातं, याचं कौतुक करावं हेच मला कळेनासं झालं आहे.

1 comment: