न्याय समान हवा

मी जेव्हा म्हणते कि आपल्या देशातील संस्कार, संस्कृती यातला बराचसा भाग स्त्रिया आणि योनिशुचितेवर आधारीत आहे ते अशा कारणांसाठी:
http://www.thehindu.com/news/national/hindu-son-can-divorce-wife-if-she-tries-to-separate-him-from-aged-parents/article9196572.ece

ज्या कारणांसाठी हिंदू पती आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ शकतो, त्याच कारणांसाठी हिंदू पत्नीने तिच्या पतीपासून घटस्फोट का घेऊ नये? मी असं म्हणत नाही कि विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्यांना आईवडिलांपासून वेगळं राहाण्यास भाग पाडतच नाही किंवा असंही म्हणत नाही कि या केसमध्ये दिलेला निकाल चुकीचा आहे पण विवाहित स्त्रीच्या आईवडिलांना तिच्या नवऱ्याने सांभाळलं आहे अशी किती उदाहरणं आपल्या ओळखीत आहेत? त्यासाठीदेखील आता कायद्याचा आसरा घ्यायचा का?

Blog0107102016

ह्या लोकसत्ता आणि म.टा.ला काय फवाद प्रेमाचा कीडा चावलाय का? एक त्याच्या दुसऱ्यांदा बाप होण्याची बातमी छापतंय, एक त्याच्या कुटुंबाची माहिती जाणून घ्या म्हणतंय. @#$%&!

हिंदी चित्रपटसृष्टीतले आणि काही फेकुलर्स अपवाद वगळता सगळी भारतीय जनता पाकिस्तानी कलाकार "नको" म्हणते आणि ह्या वृत्तपत्रांना काय फवादने बाळाच्या बारश्याच्या घुगर्‍या वाटल्या कि काय?

आपल्या देशाचे सैनिक आपल्यासाठी प्राण पणाला लावून लढतात त्याची किंमत उरली नाही का आता? तिकडे सर्जिकल अटॅक झाला तेव्हा भारतीयच काय पण पाकिस्तानी जनताही डाराडूर झोपलेली होती. झालाय का कुणाला त्रास?

राग, चीड, द्वेष, नैराश्य, मत्सर वगैरे

राग आणि चीड ह्या दोन शब्दांमधून व्यक्त होणारे भाव निरनिराळे आहेत बरं का? परिस्थितीबद्दल निर्माण होते ती चीड आणि व्यक्तीचा केला जातो किंवा व्यक्तीवर काढला जातो तो राग. दोन्हीमध्ये प्रचंड तफावत आहे. चीड ही तात्कालिक व तात्पुरती असते, पेटलेल्या कापरासारखी. चटकन पेटणे आणि चटकने विझणे ही चीड ह्या भावनेची वैशिष्ट्ये आहेत. अन्यायामुळे निर्माण होते ती चीड. ती भावना त्या व्यक्तिपेक्षाही जास्त त्या निर्माण झालेल्या परिस्थितीबद्द्ल असते पण याचा अर्थ अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर आपण सतत रागावलेले असूच असं नाही. मात्र चीड निर्माण करणाऱ्या घटनेचे आपण वारंवार साक्षिदार बनलो कि तिचं परिवर्तन रागात होऊ शकतं आणि राग ही चीरकाल टिकणारी भावना आहे.

आपल्याकडे एक म्हण आहे, वड्याचं तेल वांग्यावर. तो हाच प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग असला आणि आपल्या संतापाच्या क्षणी नेमकी तीच व्यक्ती समोर आली तर त्या व्यक्तीचा आपल्यावर उद्भवलेल्या परिस्थितीशी काही संबंध नसतानाही आपण सगळा संताप त्या व्यक्तीवर काढून मोकळे होतो. राग हा असा असतो, राखेखाली दडलेल्या ठिणगीसारखा. फुंकर मारली तर सहज दिसेल पण दुर्लक्ष केलं तर आपल्या नकळत हळूहळू, धीम्या गतीने जे, जे शक्य असेल ते सर्व भस्मसात करेल.

चीड आली कि मोर्चे निघतात, आंदोलनं होतात आणि राग आला कि मनोरूग्ण, सिरियल किलर्स तयार होतात, असं मला वाटतं.