साधारण १६-१७ वर्षांपूर्वी मी Early Childhood Education (ECE) teacher training हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.
त्या अभ्यासक्रमाअंतर्गत ३-४ वर्षाच्या मुलांना छोट्या-छोट्या नीतीकथा सांगणे, त्यांच्यासोबत गाणी म्हणणे, रंग, शब्द, खेळ, सामान्य ज्ञान देणे याशिवाय निरनिराळ्या वस्तूंचे स्पर्श कसे असतात, गाण्यांमधून हावभाव कसे व्यक्त करावे हे मी शिकवले होते.
कधी कधी ही मुलं गोष्ट ऐकता ऐकता पेंगायची पण झोप आली की सरळ मांडीवर येऊन झोपायची. अश्या वेळेस एक क्षण नि:शब्द असायचा. ती भावना निराळी होती. तिला काय नाव द्यायचं हेही मला तेव्हा कळत नव्हतं.
दोन रंगांच्या मिश्रणातून एक तिसरा रंग तयार होताना विस्मयाने विस्फारलेले लहान मुलांचे डोळे किंवा प्रत्येक वस्तूचा स्पर्श निराळा असतो ह्याचा अनुभव घेताना त्यांच्या चेहेऱ्यावर आलेले चकीत भाव हे त्यांच्यापेक्षा मलाच जास्त काहीतरी शिकवून गेलं.

अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून नर्सरी ऱ्हाईम्स आणि त्यावर आधारीत 3D चित्र असं एक पुस्तक तयार केलं होतं. कागदांचे निरनिराळे प्रकार वापरून चित्रं, पपेट शो साठी एक निमो मासा तयार केला होता. जन्माष्टमीला इतर सहाध्यायींसोबत एका प्री रेकॉर्डेड शो वर कृष्णजन्म आणि दहीहंडीवर आधारीत एक नाटीका सादर केली होती.
लहान मुलांचं कल्पना विश्व अद्भुत असतं. आम्ही पपेट शो, नाटीका सादर केल्या तेव्हा वाटलं आपलं सादरीकरण चांगलं नसावं. पण मुलांना ते खूप आवडलं होतं. कंसाला घाबरलेली मुलं बाळकृष्णाला पाहून आनंदाने टाळ्या पिटत होती. जन्माष्टमीची नाटीका त्यांना पुन्हा पुन्हा पहायची होतं, चकीत व्हायचं होतं, हसायचं होतं.
‘कृष्ण आता कुठे आहे?’ असा एका छोटीचा प्रश्न आल्यावर काय सांगावं असा मला प्रश्न पडला. खरंच कृष्ण कुठे आहे? एकच दिशा कशी दाखवावी? तो तर सगळीकडे आहे. चराचरात! तो तर सगळ्या ब्रह्मांडाचा गुरू.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । देवकीपरमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्॥
बाळाचा पहिला शिक्षक, पहिला गुरू आई असते. त्यानंतर शिक्षक हेच गुरू. लहान मुलांना माहित नसायचं कि टीचर म्हणावं कि दिदी म्हणावं. पण त्यांना भविष्यात मोठ्या शाळेत कसं वागावं, बोलावं ह्याचं प्रशिक्षण नीट मिळावं म्हणून सांगावं लागायचं - "टीचर म्हण".