Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

कोण होत्या त्या?

5 comments

आज अचानक ही घटना आठवली. ही देखील सत्यकथाच आहे. जवळ जवळ २० वर्षांपूर्वीची, तेव्हा मी मार्शल आर्ट शिकत होते. आमचा खूप छान ग्रुप होता. शनिवारी, रविवारी सर्वांना सुटी असली की आम्ही एकत्र जमत असू, ठाण्यातल्या रस्त्यांवर भटकत असू. एकदा आम्ही ठरवलं पावसाळ्यात माथेरानची सहल करायची. एक रविवार निश्चित केला आणि निघालो माथेरानला. तेव्हा एखादी गाडी बुक करावी आणि जावं असं काही डोक्यात नव्हतं. ठाण्याहून ट्रेनने कर्जत आणि पुढे प्रायव्हेट टॅक्सी करून माथेरान! तेव्हा माथेरानची ती झुकझुक गाडी नेमकी बंद होती, नाहीतर आणखीन मज्जा आली असती. पण घरून जेवणाचे डबे घेऊनच निघालो होतो. पावसाळ्याचे दिवस! अचानक दुकानं बंद बिंद झाली तर उपाशीपोटी राहायला नको म्हणून प्रत्येकाच्याच आईने काही ना काही डब्यात भरून दिलेलं.

ट्रेनचा प्रवास पिकनिकच्या गाण्यांमधे कसा सरला तेच कळलं नाही. पुढे टॅक्सीचा प्रवास. ज्या प्रकारे ड्रायव्हर टॅक्सी चढावरून घेऊन जात होते, ते बघून डोळे फिरत होते. यातल्या एखाद्या तरी ड्रायव्हरचं रस्त्यावरून लक्ष हटलं तर आपलं काय होऊ शकतं, याची कल्पना करूनच पोटात गोळा येत होता. कसाबसा तो जीवघेणा प्रवास एकदाचा संपला. पण टॅक्सीबाहेर पाय ठेवला आणि इतका वेळ जीव मुठीत धरून ठेवल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

चोहीकडे पाचूच विखरून ठेवल्यासारखा हिरवाकंच प्रदेश, मधेच दिसणारं धुकं, त्या आडून डोकावणारे लहान मोठे धबधबे, डोंगरमाध्यावर अलगद खाली उतरलेले ढग, ओलसर गारवा... स्वर्गीय! निव्वळ स्वर्गीय! त्या वातावरणात कुठल्या तरी टॅक्सीमधे कर्कश आवाजत वाजत असलेलं, "चुराके दिल मेरा, गोरीया चली..." हे गाणंसुद्धा कानांना गोड वाटत होतं. "अब यहॉं से कहॉं जाए हम, तेरी बाहों में मर जाएँ हम" अशी काहीशी अवस्था झाली होती. आपल्याला नुसतं बघून भिती वाटेल, अशा डोंगर उतारावरदेखील काही बकर्‍या आणि गाईदेखील आरामात हिरवळ चरत होत्या. कितीतरी वेळ आम्ही त्याच गोष्टीचं आश्चर्य करत होतो. सगळीकडे फिरलो, फक्त एको पॉइंटची मजा काही अनुभवता आली नाही. म्हटलं पुढच्या वेळेस, आता त्या जागी एक छानसा धबधबा वाहात होता, तोच एन्जॉय करू.

काही विशिष्ट ठिकाणीच फिरायचं असं काही ठरलं नव्हतं, त्यामुळे पाय नेतील तिकडे आम्ही भटकत होतो. मधेच पाऊस चिंब भिजवून गेला होता. ओल्या कपड्यांमधून हाडापर्यंत शिरलेला गारठा आता किंचीतसा त्रासदायक वाटत होता. भुकेची जाणीवदेखील होत होती. फिरत फिरत आम्ही कुठे गेलो होतो कुणास ठाऊक? आजूबाजूला ना दुकानं दिसत होती ना इतर पर्यटक. कदाचित खूप पाऊस पडतोय म्हणून जवळच कुठेतरी आडोशाला उभे असतील, असा विचार करून आम्ही देखील चार पाच झाडांचा आश्रय घेत आपापले डबे बाहेर काढले. पावसाने आपली करामत त्या ड्ब्यातल्या अन्नापर्यंत देखील पोहोचली होती. एअर टाईट म्हणून आत्मविश्वासामुळे पिशवीत न गुंडाळलेल्या डब्यांमधील पदार्थांमधे पाणी गेलं होतं. पण पर्वा होती कुणाला? पोटात भुकेने आगडोंब उसळला होता. पदार्थांचा वास नाकात शिरल्यावर प्रत्येक जण आपापल्या डब्यावर अक्षरश: तुटून पडला. अन्न पोटात गेल्यावर खरोखरंच बरं वाटू लागलं.

आता पुढे कुठे जायचं? असा विचार करत असतानाच काही जणांनी "आता परतू या" असा सल्ला दिला. सहज म्हणून घड्याळात पाहिलं तर दुपारचे चार वाजले होते. आम्ही इतका वेळ भटकत होतो, हे आम्हाला कळलं देखील नव्हतं. परतू या असं म्हणायला ठीक आहे पण आम्ही वाट फुटेल तसे फिरलो होतो. धुकं तर इतकं दाट की नेमकी कुठली दिशा पकडली तर आपण टॅक्सी स्टॅण्डजवळ पोहोचू हेच कळत नव्हतं. शेवटी आधी जसे पुढे गेलो तसेच चालत जाऊ या असं ठरलं. मधेच कुठेतरी चिखलाची तळी, डबकी होती. त्यातून जाता यावं म्हणून कुणीतरी दगड टाकून ठेवले होते. त्या दगडांवरून तोल सावरताना मुद्दाम दुसर्‍याला हसवायचो की तोल जाऊन त्याचे पाय त्या चिखलात माखायचे. अशीच दंगामस्ती करत करत आम्ही पुढे चाललो होतो.

अचानक वातावरणातला बदल आम्हाला सर्वांना जाणवला. पावसाळ्यात येणारे सगळेच आवाज, अगदी पानावर गळणारी पाण्याची टपटप देखील ऐकू येत नव्हती. आम्ही देखील काही कारण नसताना अबोल झालो. मूकपणे चालू लागलो. समोर उजव्या हाताला एक जुनी, पडकी एकमजली इमारत दिसत होती. त्या इमारतीच्या तळमजल्यावर दोन बायका आपले काळेशार केस मोकळे सोडून उभ्या होत्या. आम्ही फक्त एकदाच त्यांच्याकडे पाहिलं. त्या आमच्याचकडे रोखून पाहात होत्या. त्यातली हिरव्या कपड्यांमधली बाई तर फारच भेदक नजरेने पाहात होती. आम्हाला काय वाटलं कुणास ठाऊक! झपझप पावलं उचलत आम्ही पुढे गेलो. एकानेही मागे वळून पाहाण्याची तसदी घेतली नाही. पुढे एक सुनसान बाग दिसत होती. अक्षरश: चिटपाखरूही दिसत नव्हतं तिथे. तिथले झोके, सी-सॉ पाहून तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा केली असावी असं वाटत होतं. आजूबाजूच्या त्या गोष्टी पाहात असतानाच लक्षात आलं की डोळ्यांसमोर दाट धुकं पसरलं आहे. हातभर अंतरावरचा माणूस दिसणार नाही इतकं दाट धुकं! सर्वांनी चार-चार पाच-पाच जणांच्या जोड्या केल्या आणि आम्ही जपून पावलं टाकत पुढे निघालो. शेवटी एकदाच्या त्या बागेच्या पायर्‍या दिसल्या. त्या पायर्‍या उतरून खाली गेल्यावर पाहिलं तर काय! धुकं-बिकं सगळं गायब! समोर अगदी स्वच्छ पसरलेला हिरवागार परिसर दिसत होता. स्वच्छ हवेत श्वास घेतल्यावर जसं प्रसन्न वाटतं, अगदी तसंच वाटत होतं. आजूबाजूल पक्ष्यांचे, इतर पर्यटकांचे आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले आणि आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव प्रत्येकालाच झाली. सगळे जण आले आहेत ना, याची खात्री करून आम्ही टॅक्सी स्टॅन्डच्या दिशेने खाली उतरत गेलो. पण टॅक्सीत बसण्यापेक्षा इतर पर्यटक खाली पायी उतरत होते, आम्ही तोच पर्याय स्विकारला. इतका वेळ माणसांपासून लांब राहिल्यामुळे त्या अनोळखी माणसांचा सहवासदेखील आम्हाला हवासा वाटू लागला होता.

नंतर ठाण्याला परतताना ट्रेनमधे बसल्यावर आपण ज्या बायका पाहिल्या, त्या नक्की बायकाच होत्या की आणखी निराळी काही यावर आम्ही भरपूर चर्चा केली आणि शेवटी बायकाच असाव्या त्या, आपण रस्ता चुकलो होतो म्हणून भिती वाटत होती इतकंच अशी मनाची समजूत करून घेतली. पण आजदेखील आम्हाला त्या बायका कोण होत्या याबद्दल नक्की माहित नाही.

5 comments:

  1. बापरे काटा आला वाचून. तुम्हा लोकांच काय झालं असेल तेव्हा ???

    ReplyDelete
    Replies
    1. आधीच थंडी, त्यात भिती. पार दयनीय अवस्था झाली होती आमची.

      Delete
  2. Baapre. Aga asla anubhav malahi Alay. Danger. Itki bhiti vatte ki bas. Nantar vichar karne vagaire thok. Tevha kahihi suchat nahi agdi

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना! अगदी तसंच झालंय.

      Delete