19 December 2013

शंभराच्या नोटा तुम्ही मला आणा राया!

चिडचिड होतेय नुसती चिडचिड. वैताऽऽग!

कारण माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून माझा नवरा मला घरखर्चासाठी जे पैसे देतो, त्या चक्क हजाराच्या नोटा असतात! का, तर म्हणे मला ATM मधे जाण्याची तसदी पडू नये म्हणून. अरे पण राव, तुझ्या त्या हजाराच्या नोटा रोज-रोज कुठे चालवू मी? हजाराच्या नोटा देतो आणि माझ्याकडे काय पन्नास शंभरच्या नोटा असतील, त्या मागून घेतो. रोज टॅक्सीला द्यायला लागतात म्हणे! आणि मला नाही का लागत? कैच्याकै! आता या हजाराच्या नोटा जर सुट्ट्या करून मिळत नसतील तर मला बॅंकेत हे पैसे भरून मग ATM मधून थोडे थोडे पैसे काढणं क्रमप्राप्त आहे ना? हा द्राविडी प्राणायाम झाला की नाही? पण नाही, माझ्या सरळसोट आयुष्यात थोडी हलचल पैदा केल्याशिवाय नवरोबाला चैनच पडत नाही.

भाजी, किराणा सामान यात रोज पैसे खर्च होतात पण म्हणून एक हजाराची खरेदी रोज करतं का कुणी? शंभराची नोट असेल तर सुटे सहज मिळून जातात. सुरूवातीला किराणावाला, भाजीवाला यांच्याकडे हजाराच्या नोटा चालवल्या. आता खरेदी केली तर गल्ल्यावर बसलेला माणुस चष्म्यातून तिरक्या नजरेने पाहात खोचक स्वरात म्हणतो, "हजाराचीच नोट असेल ना? द्या, द्या. आम्ही सुट्टे द्यायलाच बसलोय." तोंड वेंगाडून नोट सुटी करून घेण्याशिवाय काही गत्यंतर आहे का मला?

परवा तर अगदी कहरच झाला. सकाळी सात वाजता धोबी हजर आणि मागच्या बिलाचे पैसे देण्यासाठी माझ्याकडे सुट्टे पैसेच नाहीत. नाईलाज म्हणून मी हजाराची नोट पुढे केली तर तो हसला माझ्याकडे पाहून आणि म्हणाला "अगले हफ्ते दे देना" म्हणून निघून गेला. बरोबर आहे ना! सकाळी सात वाजता धोबी कशाला हजाराचे सुट्टे खिशात घेऊन फिरेल?

आता सुट्ट्या नोटा कशा गोळा कराव्या या चिंतेत आहे मी. रोज संध्याकाळी नवरा घरी आला की "शंभराच्या नोटा तुम्ही मला आणा राया" असं गुणगुणून पाहाते. त्याला माझी अडचण कळली तर कळली.

5 comments: