08 April 2014

न्यायाच्या अपेक्षेत...

बलात्कार्‍याला शिक्षा काय व्हावी, याबद्दल माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी म्हणेन की तो बलात्कारी समाजाचा गुन्हेगार नंतर होतो; आधी तो त्या स्त्रीचा गुन्हेगार असतो जिच्या आयुष्याची त्याने राख केलेली असते. अशा नराधमाला शिक्षा काय करायची हे विचारायचं असेल, तर ते त्या पिडीत स्त्रीला आधी विचारावं.

त्या दिल्लीवाल्या मुलीने "त्या नराधमांना जाळा" म्हटलं. शक्ती मिल प्रकरणातील मुलगी म्हणते "फाशीची शिक्षा पुरेशी नाही" यात काय ते समजून जा. कोणतीही बलात्कारीत स्त्री ’बलात्कार्‍याला माफ करा’ म्हणत नाही किंवा ’फाशीची शिक्षा योग्य आहे’ असं म्हणत नाही. गुन्हेगाराला फाशी दिली की त्याचं आयुष्य एका क्षणात संपून जातं. पण त्या पिडीत स्त्रीला प्रत्येक क्षण, प्रत्येक पळ जे मरण त्याने कारण नसताना भोगायला लावलेलं असतं, त्याचं काय? "अ‍ॅन आय फॉर अ‍ॅन आय" हा कायदा रानटी, पशुवत, अश्मयुगाकडे नेणारा वाटतो पण ज्या समाजाच्या सुव्यवस्थापनासाठी कायदे बनवले जातात, त्याच समाजाचा स्त्रीयादेखील एक भाग आहेत ना? मग ज्या शिक्षेमुळे पिडीत स्त्रीला न्याय मिळाला असं वाटतच नाही, त्याला शिक्षा कसं म्हणता येईल? ज्या शिक्षेमुळे संभाव्य गुन्हेगारांना वचक न बसता, ते तसाच गुन्हा अधिक गंभिररित्या करायला धजावतात, त्याला शिक्षा कसं म्हणता येईल?

आपल्याकडे बलात्कारी त्यामानाने सुदैवीच म्हटले पाहिजेत कारण कठोरात कठोर म्हणून आणि बलात्कारीत स्त्रीला जर प्राणांतिक जखमा झाल्या असतील, तरच फाशीची शिक्षा ठोठावली जाते पण जरा विचार करा कि सौदी अरेबिया सारख्या देशामध्ये जिथे स्त्रिया बुरख्याशिवाय आणि वडील किंवा पतिच्या सोबतीशिवाय घराबाहेर पडूच शकत नाहीत, त्या देशातसुद्धा बलात्कारासारखा गुन्हा घडण्याची शक्यता गृहीत धरून अत्यंत कडक शिक्षा निश्चित केली गेली आहे. आपल्याकडे तशा प्रकारची शिक्षा मंजूर करणं हे अमानुषपणाचं लक्षण आहे, असं काहीजणांना वाटण्याची शक्यता आहे पण स्त्रीवर बलात्कार करणं हे कोणत्या माणुसकीचं लक्षण आहे?

जर बलात्कार्‍याला फाशीची शिक्षा देऊन सगळे प्रश्न सुटत असले तर बलात्कारीत स्त्रीसाठी समुपदेशन आणि पुनर्वसन याची काय आवश्यकता आहे? स्त्रीच्या मनाचा कुणी विचार करतं का? विद्ध झालेल्या, तडफडत असलेल्या मनाला शांत करण्यासाठी प्रतिशोध हा जर उपाय नसू शकेल तर समुपदेशन आणि क्षमा हे पर्यायदेखील कसे असू शकतात? "आयुष्यातून उठणं" याचा शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ काय होतो?

माझ्या फेसबुक प्रोफाईलवरचा काळा फोटो पाहून बरेच जण मला मी हा फोटो का लावलाय, असा प्रश्न विचारतात. ज्यांना या प्रश्नाचं उत्तर आधी पासून ठाऊक आहे, ते मला हा फोटो कधी काढणार असं विचारतात.

हा फोटो लावताना माझ्या डोळ्यांसमोर एकच उद्देश होता - स्त्रीवर आज बलात्कारासारखा अत्याचार सहज करता येण्याजोगी परिस्थिती आली आहे आणि बलात्कार्‍याला मिळालेली शिक्षा पाहून अत्याचाराविरुद्ध न्याय मिळाला, असं खुद्द पिडीत स्त्री म्हणत नाही, हे माझ्या स्मरणात राहावं. माझ्या व्यक्तिगत मत प्रदर्शनासाठी मी फेसबुक हे माध्यम निवडलं आहे, तिथेच हा काळा फोटो मला सतत दिसू शकणार आहे.

हा काळा फोटो मला सतत का दिसत राहावा? उत्तर सोपं आहे - मी एक स्त्री आहे. माझ्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडूच शकणार नाही, अशा माझ्या फाजिल गैरसमजात मी राहू नये म्हणून. कदाचित काळा फोटो लावणं हा प्रकार कुणाला बालीशदेखील वाटू शकेल पण चार चांगल्या गोष्टी घडल्या कि सगळंच छान होतं आहे, या गैरसमजात आपण इतके बुडून जातो कि वाहावत कुठे येऊन पोहोचलो आहे, याचं भानदेखील आपल्याला राहात नाही. हा काळा फोटो मला त्या चार चांगल्या गोष्टी आनंदाने उपभोगू दिल्यानंतर पुन्हा वास्तवाची जाणीव करून देतो.

बलात्कार्‍याला कोणतीही शिक्षा होवो पण ज्या दिवशी बलात्कारित स्त्री "मला न्याय मिळाला" असं चार लोकांसमोर उघडपणे म्हणेल, त्या दिवशी हा काळा फोटो मी नक्की काढेन.

No comments:

Post a Comment