Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

गझल माझी निराळी

0 comments
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी ज्या गृहस्थांकडे टायपिंगची खाजगी कामं करून देत असे, त्यांनी एकदा मला विचारलं, "तुला म्युझिकची, गाण्यांची आवड आहे का गं?"

मी म्हटलं, "हो तर. खूपच आवड आहे."

"गझल वगैरे ऐकतेस का?" त्यांनी विचारलं.

"हो, हो. गुलाम अली, पंकज उधास..." मी उत्साहाने सुरूवात केली.

पण त्यांनी मला पूर्ण बोलू दिलं नाही. म्हणाले, "अगं, त्यांना सोड. आज एका नव्या गायकाचा आवाज ऐकवतो तुला. या सगळ्यांचा गझला विसरून जाशील तू. हे बघ, आजच कॅसेट आणली आहे. चल ऐकू."

मी काम बाजूला ठेवून नव्या गायकाचा आवाज ऐकण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी कॅसेट टेपरेकॉर्डमध्ये सरकवली. प्ले चं बटण दाबलं आणि कॅसेट मधून एक आर्त स्वर ऐकू आला...

"तुम तो ठहरे परदेसीऽऽऽऽ... साथ क्या निभाओगेऽऽऽ"

मी जेमतेम धक्क्यातून सावरत आंवढा गिळलाच असेल; त्यांनी कौतुकाने माझ्याकडे अभिप्रायासाठी पाहिलं.

"काय? म्हटलं होतं ना, सगळ्यांना विसरशील म्हणून?"

’ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’ एवढंच करणं माझ्या हातात उरलं होतं.

No comments:

Post a comment