लायकी

ही गोष्ट मी नेमकी कुठे वाचली ते आठवत नाही पण आज उदाहरणादाखल सांगतेय.

एक आटपाट नगर असतं, त्या नगराचा राजा मोठा शूर आणि कर्तबगार असतो. प्रजेच्या सुखदु:खाची खबरबात घेण्यासाठी तो बर्‍याचदा वेष पालटून नगरातून फेरफटका मारत असे. असाच फेरफटका मारत असताना राजाला एक भिकारीण दिसते. ही भिकारीण नुसती तरूणच नाहीतर रूपवती असते.

सौंदर्यवती असूनदेखील त्या स्त्रीला भीक मागावी लागते, याचं राजाला फार दु:ख होतं. तो सरळ तिच्याशी लग्नच करतो. भिकारीण एका रात्रीत राणी बनते. राजाला एक सत्कृत्य केल्याचा मनापासून आनंद झालेला असतो. ऐश्वर्यात राहिल्यावर राणीचं मूळसौंदर्य आणखीनच उजळ होईल, राणी सुखाने नांदेल असा त्याला विश्वास असतो.