Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

लायकी

0 comments
ही गोष्ट मी नेमकी कुठे वाचली ते आठवत नाही पण आज उदाहरणादाखल सांगतेय.

एक आटपाट नगर असतं, त्या नगराचा राजा मोठा शूर आणि कर्तबगार असतो. प्रजेच्या सुखदु:खाची खबरबात घेण्यासाठी तो बर्‍याचदा वेष पालटून नगरातून फेरफटका मारत असे. असाच फेरफटका मारत असताना राजाला एक भिकारीण दिसते. ही भिकारीण नुसती तरूणच नाहीतर रूपवती असते.

सौंदर्यवती असूनदेखील त्या स्त्रीला भीक मागावी लागते, याचं राजाला फार दु:ख होतं. तो सरळ तिच्याशी लग्नच करतो. भिकारीण एका रात्रीत राणी बनते. राजाला एक सत्कृत्य केल्याचा मनापासून आनंद झालेला असतो. ऐश्वर्यात राहिल्यावर राणीचं मूळसौंदर्य आणखीनच उजळ होईल, राणी सुखाने नांदेल असा त्याला विश्वास असतो.

पण घडतं उलटंच. राणीचं सौंदर्य उजळ होण्याऐवजी तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतच जाते. वैद्यांचं औषध, दृष्ट काढणं, गंडे-दोरे या कशाचाही उपयोग होत नाही. राणी जास्तच आजारी पडू लागते. राजा चिंतेत पडतो. मग राजाचा प्रधान राजाला एक उपाय सांगतो.

प्रधानाने सुचवल्याप्रमाणे राजा रोज रात्री राणीला तिच्या महालात एकटीला सोडून जातो. जवळ जवळ पंधरा दिवस असे केल्यावर मात्र राणीची तब्येत हळूहळू सुधारू लागते. तिच्या गालावर लाली दिसू लागते. तिचं सौंदर्य उजळतं. ती हसू-खेळू लागते. राजाला या गोष्टीचं मोठं आश्चर्यच वाटतं. इतके उपाय केले, कशाचाच उपयोग नाही झाला आणि प्रधानजींनी सांगितलेला हा विचित्र उपाय कसा काय लागू पडला?

राजा उत्सुकतेने प्रधानाला विचारतो. प्रधान हसून म्हणतो, "महाराज,आपल्याला सत्य जाणून घ्यायचं असेल, तर आज राणी साहेबांना महालात एकटं सोडलंत की गपचूप त्यांच्यावर पाळत ठेवा. त्या जे करतात, ते त्यांना करू द्या आणि उद्या सकाळी काय तो निर्णय घ्या." राजा या गोष्टीला तयार होतो.

रात्र होते, तशी राणी राजा आपल्या महालातून केव्हा निघून जातो, याची वाट पाहात चुळबुळ करू लागते. राजा महालातून निघून जातो. पण तिच्यावर गुपचूप पाळत ठेवतो. राजा गेला हे पाहून राणी गपचूप महालाच्या एका खिडकीतून बाहेर पडते. राजवाड्याबाहेर जाऊन वेषांतर करते आणि तोंड झाकून नगरातल्या काही घरांसमोर जाऊन भीक मागते. तिला जे काही भीक म्हणून मिळतं, ते ती एका कोपर्‍यात घाईघाईने संपवते आणि पुन्हा आल्या वाटेने राजवाड्यातील आपल्या महालामध्ये परतते.

राणीचं हे कृत्य पाहून राजाला खूप संताप येतो. दु:खही होतं. तो राणीला याचा जाब विचारणार असतो. मग त्याला प्रधानजी काय म्हणाले होते, ते आठवतं. दुसर्‍या दिवशी सकाळी राजा आपल्या प्रधानाला भेटतो आणि त्यांना सारी हकीकत सांगतो. प्रधान म्हणतो, "हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो महाराज. राणीसाहेबांनी लहानपणापासून भीक मागून आपली गुजराण केलेली आहे. आता अचानक सर्व सुखं मिळाल्यामुळे त्यांना ते सहन करणं कठीण जातंय. तुम्ही त्यांना कितीही सुखात ठेवलंत तरी चार घरी भीक मागून मिळालेलं उरलं सुरलं अन्न पोटात गेल्याशिवाय त्यांना चैन पडणारच नाही."

राजा काय ते ओळखून राणीला पुन्हा तिच्या मूळ जागी नेऊन ठेवतो.

तात्पर्य: काही लोक देखील असेच असतात. आपण कितीही चांगल्या गोष्टी पटवून दिल्या तरी हे लोक आपली लायकी दाखवल्याशिवाय राहात नाहीत. ज्यांना वाङ्मय चौर्याची सवय लागलेली असते, त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये चौर्यकर्माशिवाय इतर काहीही दिसत नसतं. मग आपण यशस्वी आहोत, असं कितीही ते जगाला टाहो फोडून सांगत असले तरी लोक त्यांची लायकी ओळखून असतात. पण या चोरांनाच ते कळत नसतं.

Update: This blog is also posted on Facebook.

No comments:

Post a Comment