Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

आमचा पाहुणा खंडू

0 comments

एखाद्या पक्ष्याने आमच्या घरात आश्रय घेण्याची ही पहिली वेळ नव्हे. बरेचदा कावळ्याच्या हल्ल्यापासून वाचण्याकरीता कबुतरांनी आमच्या बाल्कनीमधील स्टुलखाली आश्रय घेतला आहे. दोन वेळा कावळ्यांच्या तावडीतून कबुतराला आणि एकदा निराळ्याच जातीच्या पिवळ्या, तपकीरी रंगाच्या पक्ष्याला मी स्वत: वाचवलं आहे. पण ते तेवढ्यापुरतं होतं. अर्ध्या तासापेक्षा जास्त मुक्काम त्यांचा राहिला नाही आणि घरात जरी म्हटलं तरी प्रत्यक्षात त्यांचं आश्रय घेणं बाल्कनीपुरतंच मर्यादीत होतं.

हा खंडू देखील कावळ्यांच्या हल्ल्यामध्येच जखमी झाला होता पण तो काही स्वत: आमच्या घरी आश्रयाला आला नाही. भावाने त्याला कावळ्यांपासून वाचवलं आणि त्याचा फोटो फेसबुकवर अपलोड केला. काळजी वाटली म्हणून त्याला फोन करून याची चौकशी केली आणि दैवाने या खंडूची काळजी घेण्यासाठी आमचंच घर निवडून ठेवलं होतं, हे लक्षात आलं.

तपकिरी शरीर, निळे-तपकिरी पंख, आतल्या बाजूला पांढर्‍या रंगाचे पट्टे, पुढच्या बाजूला गळ्यापासून खाली एक पांढर्‍या रंगाचा पट्टा, तपकिरी लांब चोच, त्यावर पुढे एक पांढरा ठिपका, नाजूक पाय आणि अजूनही पिल्लू असल्याच्या खुणा शरीरावर मिरवत खंडू्चं आमच्या घरात एका रिकाम्या बॉक्समधून आगमन झालं. अचानक आलेला हा लहानसा पाहुणा, त्याला आमची भाषा कळत नव्हती आणि आम्हाला त्याची. पण त्याच्या सरबराईसाठी आम्हा नवराबायकोची लगबग उडाली.

या घरात कधीही पक्षी पाळलेले नसल्यामुळे पिंजरा नव्हताच. मग आता याला ठेवायचं कशामध्ये? सतत त्या कोंदट बॉक्समध्ये तर ठेवू शकत नाही. शेवटी लक्षात आलं, घरात एक जरीच्या साड्या ठेवण्यासाठी असतं, ते बॉक्ससारखं जाळीचं कव्हर पडून होतं. त्याची झीप निघाल्यामुळे ते कधी वापरलंच गेलं नाही. निर्जिव वस्तूंना सुद्धा दैवगती असावी असं वाटतं. सासूबाईंकडून काहीही गरज नसताना मागून घेतलेले ते कव्हर आज अचानक उपयोगी पडलं.


या कव्हरमध्ये ठेवल्यावर त्याने थोडी गडबड केली. करणारच ना! शेवटी मुक्त जगणारा जीव तो. आम्हालाही वाईट वाटत होतं पण उडण्यासारखी अवस्था नव्हती त्याची. उजव्या पंखाखाली थोडी इजा झाल्यामुळे तो लंगडत होता. अजून लहान असल्यामुळे नीट भरारी घेता येत नव्हती. आत्ता सोडलं असतं बाहेर तर पुन्हा तेच...

"त्यापेक्षा राहा बाबा एक दीड महिना इथेच, धष्टपुष्ट हो, कावळ्यांना चुकवण्याइतकी ताकद तुझ्या पंखांमध्ये येऊ दे, मग तू जा" असं सांगून त्याला खाऊ खायला घातला पण साहेबांनी मच्छी सोडून इतर कशाला तोंड लावलं नाही. "या लोकांनी प्रेमाने खंड्या म्हटलं म्हणून काय झालं, आपण आपल्या किंगफिशर या इंग्रजी नावाला जागलं पाहिजे" हे खंडूने ठरवून ठेवलं होतं. घरात होत्या त्या मच्छीचे तुकडे खायला घातले आणि कधीही भर दुपारी घराबाहेर न पडणारी मी, धावतपळत त्याच्यासाठी मच्छी आणायला खाली उतरले.

त्याला थोडंसं जरी चुचकारलं तर आपल्या खणखणीत आवाज प्रतिसाद देतो. माणसं जवळ आलेली चटकन कळतात. कुणी खायला देत असेल तर त्याच्याकडे नजरेला नजर देऊन पाहात राहतो, बोटावर ठेवलेली मच्छी आईच्या चोचीमधून घ्यावी अशा सहजपणे घेतो, मुख्य म्हणजे अंगाला बिनधास्त हात लावून देतो. एवढा कधी माणसाळला असेल हा पक्षी? हा विचार आम्ही दोघंही करत होतो.

त्याला चुचकारणं, लाड करणं यातच पाच सहा तास कसे निघून गेले कळलं नाही. मग संध्याकाळी नवरा-बायको जाऊन एक मोठा पिंजरा घेऊन आलो. शेवटी जाळीच्या कव्हरमध्ये तरी किती दिवस ठेवणार त्याला? व्हेंटीलेशनची अडचण नव्हती पण आपल्याला असं राहायला आवडलं नसतं, तर त्या मुक्या जीवाला तरी का असं ठेवायचं? हे बाळ नीट भरार्‍या घेऊ शकणार नाही, म्हणून त्या पिंजर‍यातला झुला काढला आणि साहेबांची त्या पिंजर्‍यामध्ये रवानगी केली.


माझ्या माहेरी एक पोपट पाळला होता, त्याच्या अनुभवारून लक्षात होतं की रात्री झोपताना पिंजर्‍याला चादरीने गुंडाळून ठेवलं तर त्यांना शांत झोप लागते. पिंजर्‍याचा वरचा भाग हवेसाठी मोकळा ठेवायचा. इतर चार बाजू झाकल्या की आपल्या वावराने त्यांना डिस्टर्ब होत नाही आणि पाळीव पक्षी निवांतपणे झोपतात. इथे चादर गुंडाळून दोन सेकंद झाले नाहीत तर कोण गहजब झाला. फडफडून झालं, निरनिराळे आवाज काढून झाले पण आपले नवीन यजमान कशाला बधत नाहीत म्हटल्यावर गुमान झोपली स्वारी.

सकाळी उठून पाहिलं तर साहेब एकदम फ्रेश. मी गुडमॉर्निंग म्हणायच्या आधीच खंडूने आपल्या खणखणीत आवाजात मला गुड मॉर्निंग केलं. आता तो बरा होण्याची आणि थोडा मोठा होण्याची वाट पाहातेय. जिथे यांच्या प्रजातीचा वावर जास्त असतो, त्या ठिकाणी याला सोडून देऊ. पण अजूनही काळजी वाटते. आमच्याकडे महिना-दीड महिना राहिल्याने त्याचं पाण्यातली शिकार करण्याचं कसब तो विसरणार तर नाही ना? आतापर्यंत आम्ही त्याला भरवत आलो, आता स्वत:चे स्वत: किमान किडे, किटक तरी पकडेल ना तो? पाणी पिईल की नाही? कारण इथे हा स्वत: पित नाहीये, ड्रॉपरने पाजावं लागतंय.

पण तरीसुद्धा, जेव्हा पिंजर्‍यातून मोकळ्या आकाशात विहरणार्‍या पक्षांकडे तो मान वर करून पाहातो, बाहेरच्या पक्षांचा आवाज कानात साठवून त्यांना प्रतिसाद देतो, तेव्हा नकळत डोळे भरून येतात.

खंडू,तू लवकर बरा हो बाबा आणि लवकर मोठा हो रे! माझ्यासारख्या आतून कोरड्या झालेल्या व्यक्तीचे डोळे तुझ्यासारख्या इवल्या जीवामुळे वारंवार ओले होणं चांगली गोष्ट नाही. तुला आम्ही आणि आम्हाला तू कितीही आवडत असलास तरी तुला जावंच लागेल. तो निसर्गच तुझं घर आहे.

No comments:

Post a Comment