19 November 2018

जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुरूषांनाही दु:ख असतात आणि बरेचसे पुरूष ते बोलून दाखवत नाहीत. हे खरं आहे. बायकांचे अश्रू उघड दिसतात; पुरुषांचे दिसत नाहीत.

बऱ्याच पुरुषांना साधा चहा करता येत नसतो पण त्याच पुरूषांना, त्याच पुरूषी अहंकारामुळे चारचौघात धड व्यक्तही होता येत नसतं. वRेली नदी आतून अव्याहत वहात असते, तसेच तेही वरकरणी निर्विकार दिसत आतल्या आत स्वत:शीच व्यक्त होत राहतात.

आपल्या भावना उघड बोलून दाखवल्या आणि कुणी त्याची खिल्ली उडवली तर? ह्या भीतीतून कुणी समजून घेणारं भेटलं तरी मोकळे होऊ शकत नाहीत किंवा चुकीच्या शब्दांत व्यक्त होतात आणि माणसांना लांबच ढकलून देतात. जागतिक स्त्री दिनाला बायकांना शुभेच्छा देतात आणि बैल पोळ्याला ’पुरूष दिन’ म्हणत कुठेतरी स्त्रियांविषयी असलेला सॉफ्ट कॉर्नर विनोदी ढंगाने व्यक्त करतात.

वडिल, भाऊ, नवरा, मुलगा, मित्र अशी नाती निभावताना त्यांनाही सांभाळून घेणारं, समजून घेणारं, वेळप्रसंगी कुशीत शिरून रडता येईल असं कुणीतरी हवं असतंच.

तर, अशा सर्व पुरूषांना, माझ्या मित्रांना, मित्र नसलेल्या मित्रांना आणि माझ्या नवऱ्यालासुद्धा एवढंच सांगायचंय – व्यक्त व्हा! एकच आयुष्य असतं. पुनर्जन्म असतो कि नाही कुणी पाहिलंय? स्वत:च्या बायकोकडे नाही तर आईकडे, बहिणीकडे, मैत्रीणीकडे, मित्राकडे व्यक्त व्हा! मोकळं होऊन जगा.

जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment