Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

अभिमानही सोयिस्कर असतो का?

0 comments
महाराजांना देव समजावं कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्यांना असं वाटतं कि मेघडंबरीत बसून फोटो काढण्यात काहीही गैर नाही, त्यांनी आजपासून आपल्या कार्यालयामध्ये कुणालाही आपल्या अधिकाराच्या खुर्चीच्या आसपास खुशाल रेंगाळू द्यावं, फोटो काढू द्यावेत. बघा, जमतं का?

ह्यावर बऱ्याच निरनिराळ्या प्रतिक्रियांनी फाटे फुटू शकतात - स्मारक, पुतळ्याची जागा, मूळ जागा, किल्यांचं जतन इ. इ. पण वस्तूस्थिती काय सांगते? आज तिथे शिवछत्रपतींचा सिंहासन विराजित पुतळा आहे आणि त्याच्या भोवती सिंहासनाची शोभा वृद्धिंगत करणारी मेघडंबरी बांधली आहे.

देवळांचं सोडा, आपल्या राहत्या घरासमोर चार फूट जागा वाढवून आपण खाजगी बाल्कनी केली तर तिथे लोकाचं सामान आपण ठेवू का? आपल्याला जर मन इतकं मोठं करता येत नसेल तर महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणारी काही स्थानं आपणच निर्माण केली असतील तर त्याचा मान आपण नाही राखायचा तर काय कोणी?

कुठल्या प्रसिद्ध राजकीय नेत्यांना कधी एक सामान्य माणूस म्हणून खाजगीत भेटायला गेला आहात का? त्यांच्या भोवती त्यांचे स्वीय सहाय्यक, अंगरक्षक ह्यांचा एवढा गराडा असतो कि त्या नेत्यांच्या दिशेने नुसता हात केला तरी आठ, दहा माना तुमच्याकडे संशयाने वळलेल्या दिसतील. तुम्हाला किमान ५-६ फूट लांबूनच बोलावं लागतं त्यांच्याशी. पाया पडण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागते. म्हणजे जिवंत व्यक्तीसोबत आदर नाही तर किमान भितीने आपल्याला अदबीने वागावं लागतं. मग आज महाराज सदेह नाहीत म्हणून आपण वाटेल तसं वागू शकतो का?

महाराजांविषयी आपल्याला वाटणारा आदर-अभिमान हा फक्त फक्त ’जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देण्यापुरता आहे का?

जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी अगणित मावळ्यांनी संघर्ष केला, रक्त सांडलं.... त्यात आपलेही पूर्वज आहेत, हे आपण अभिमानाने सांगतो, त्या आपल्या पूर्वजांचे सहकारी-नेता, आपल्या जनतेचे प्रतिनिधी सिंहासनावर बसलेले आपण मूर्तीतून साकारतो; तश्याच प्रकारे समाज आपलंही माहात्म्य गाईल इतपत संघर्ष करून आपल्या अंगी तेवढी योग्यता येत नाही, किमान तोवर तरी आपण त्या पवित्र जागी बसून फोटो काढू नयेत एवढी साधी गोष्ट समजण्यास अवघड नसावी.

आज मेघडंबरीत बसून फोटो काढलेत पण उद्या शिवाजी पार्कातल्या महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी बसून फोटो काढले तरी चुकीचंच आहे ते. कारण महाराजांचा पुतळा हा ’एक पुतळा’ म्हणुनच गृहित धरता जातो.

प्रश्न एक-दोन जणांनी मेघडंबरीत बसून फोटो काढले इतपतही मर्यादित नाही. ’त्या पवित्र जागी तलवारीची चोरी होते, तरूणांचे वाईट चाळे चालतात, सुरक्षा यंत्रणा अपुरी पडते, ती जागा आधी अमूक कामासाठी होती आणि नंतर तिथे तमूकची परवानगी दिली’ अश्या आशयाच्या निरनिराळ्या कालपासून बातम्या वाचल्या. त्या सर्व गोष्टींमुळे मनात जी प्रतिक्रिया उमटली ती शब्दबद्ध केली आहे.

देशमुखांनी क्षमेचा संदेश प्रकाशित करून वाद मिटवला पण त्यानंतरही त्यांचा महाराजांच्या चरणांवर नतमस्तक होतानाचा फोटो पाहून अनेकांची काळीजं द्रवलेली दिसली. अश्या कश्या चटकन भावना बदलतात तुमच्या? गडावरच्या तोफांवर बसलेल्या मुलींचा फोटो पाहून अपशब्द वापरले जातात; थोड्या वेळाने त्याच मुलींनी ’अपॉलजी’ची पोस्ट टाकून तोफेला हार घालतानाचा फोटो टाकला तर भावना बदलतील का?

No comments:

Post a comment