Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

अंदमान पर्व

0 comments
’अंदमानातील काळ्या पाण्याची कठोर शिक्षा’ हे शब्द वाचणं, त्याबद्दल ऐकणं आणि प्रत्यक्षात तो अनुभव घेणं ह्यात केवढं अंतर आहे ते काल डॉ. सत्चिदानंद शेवडे आणि त्यांचे सुपुत्र वैद्य परिक्षीत शेवडे यांचे ’अंदमान पर्व’ ह्या विषयावरील व्याख्यान ऐकल्यावर कळले. पिता, पुत्रांनी काल प्रथमच एकाच मंचावरून एकाच वेळी अंदमान पर्व उलगडून दाखवले. काल ह्या दोन व्याख्यात्यांसोबतच डॉ. सत्चिदानंद शेवडे यांचे पिताश्री, ज्येष्ठ प्रवचनकार भारताचार्य डॉ. सु.ग. शेवडे ह्यांच्या प्रारंभिक भाषणामुळे पिता-पुत्र-नातू अश्या तीन्ही पिढ्या एकाच मंचावर पाहण्याचे भाग्य लाभले.


सेल्यूलर कारागृहाचा आभास निर्माण करणारा मंच, छायाचित्र प्रस्तुती आणि शेवडे पिता-पुत्रांसारखे वक्ते... मनाने केव्हा त्या काळात जाऊन पोहोचलो हे कळलंदेखील नाही. ’प्रतिकूल परिस्थिती’ हे शब्दही ज्याचं वर्णन करण्यास फिके पडावेत अश्या वातावरणात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ११ वर्षे काढली ती केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आधारावर. मायभूमी स्वतंत्र व्हावी म्हणून अश्या कित्येक वेड्यांनी आपल्या घरादारावर पाणी सोडून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. कारावास भोगला, मृत्यू कवटाळला पण स्वातंत्र्याचा ध्यास सोडला नाही. मात्र आज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्यासारख्या महान क्रांतीकारकारकांची चालविलेली उपेक्षा पाहून मन विषण्ण होतं. अनेक गोष्टी ज्या आजपर्यंत लक्षातच आल्या नाहीत त्या कालच्या व्याख्यानामुळे समजून आल्या.


आजच्या युगात दोन अधिक दोन म्हणजे पाच अशी गणितं मांडणाऱ्या अफवा समाजमाध्यमांवर पसरवल्या जातात. काही वृत्तपत्रे व वाहिन्यादेखील ह्यात मागे नाहीत. अश्या परिस्थितीत सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडण्याकरिता डॉ. सत्चिदानंद शेवडे आणि वैद्य परिक्षीत शेवडेंसारख्या वक्त्यांची नितांत आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment