Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

फ्रेडी मर्क्युरी - द लेजिंड

0 comments
Happy birthday, Darling.

फ्रेडीचा हा मला सर्वात जास्त आवडलेला फोटो. लोकांसमोर त्याची प्रतिमा खूप भडक, उत्साही होती. त्याच्या खासगी आयुष्यात तो लाजाळू, मितभाषी होता. हे सगळे परिस्थितीनुरूप झालेले बदल पण प्रत्यक्ष फ्रेडी कसा होता? मला असं वाटतं कि त्याचं प्रतिबिंब ह्या फोटोत उमटतं - नवीन जाणून घ्यायला उत्सुक, निरागस आणि आशावादी.


त्याचे निरागस भाव त्याने लिहिलेल्या गाण्यांमधूनही जाणवतात. तो प्रसिद्ध होताच पण त्याच्या आयुष्यावर आधारित - बोहिमियन ऱ्हॅप्सोडी (Bohemian Rhapsody) चित्रपटामुळे तो आणखी बऱ्याच जणांना माहित झाला.सत्यकथा किंवा पुस्तकावर बेतलेल्या चित्रपटांच्या बाबतीत नेहमी होतं तेच याही चित्रपटाच्या बाबतीत झालं. फ्रेडीच्या आयुष्यात घडलेली प्रचंड उलथापालथ दीड तासाच्या चित्रपटात उलट-सुलट संदर्भ लावून दाखवल्यामुळे फ्रेडी खरंच असा सिनेमात दाखवला तसा उद्धट, वाया गेलेला होता कि काय, असं वाटत राहातं. यूट्यूबवर असलेले फ्रेडीचेअसंख्य व्हिडिओज ह्या समजूतीला छेद देतात हा भाग निराळा.

बोहिमियन ऱ्हॅप्सोडी हे त्याने लिहिलेलं, गायलेलं गाणं (त्यातील संगीतासकट) त्याच्या आयुष्याचा परिपाक आहे. त्याच्या बॅन्डचा साथिदार ब्रायन मे ह्याने गाण्यात छेडलेल्या गिटारच्या आर्त सुरांनी ते गाणं आणखी उंचीवर नेऊन ठेवलं आहे, हे इथे नमूद केलंच पाहिजे.


प्रसिद्ध व्यक्ती असो वा सामान्य माणूस, त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे चर्चेचा विषय असू नये असं मला वाटतं पण लोकांना नेमका त्यामध्येच रस असतो. म्हणून असेल कदाचित, फ्रेडीने आपल्या लैंगिक आवडीनिवडी कधीही लपवल्या नाहीत पण त्यांचा दिखाऊपणाही केला नाही. त्याच्या बर्थडे पार्ट्या रंगीत, भडक असायच्या पण हाच कोलाहल त्याला त्याच्या एकटेपणात आठवण म्हणून कामी येत असावा बहुधा. उत्कृष्ट आवाज, संगीताची जाण, बॅन्डचे ३ साथिदार, १ आयुष्यभर साथ देणारी प्रेमिका, असंख्य बॉयफ्रेंड्स, चाहत्यांच्या प्रेमामुळे मिळालेली अमाप प्रसिद्धी आणि उधळूनही कमी होणार नाही इतका पैसा सोबतीला असताना फ्रेडी आपल्या वैयक्तिक आयुष्यात एकटा होता. त्यातच एड्ससारख्या आजाराने त्यात भर टाकली होती. त्याच्या शेवटच्या काही वर्षांत जिमी हटन ह्या त्याच्या बॉयफ्रेंडने त्याचा एकटेपणा दूर केला असावा. तो त्याच्यासोबत आनंदी होता.


मला खासकरून कलाकरांचे वाढदिवस, स्मृतीदिन ह्यावर लिहायला आवडत नाही पण फ्रेडी अपवाद आहे. तो आणखी अनेक वर्षं आपल्यात असायला हवा होता. शापित गंधर्व सारखी संज्ञा फ्रेडीला खरोखरच लागू होते. आज इंग्रजी तारखेनुसार त्याच्या वाढदिवस. पारसी दिनदर्शिकेनुसार त्याचा वाढदिवस पारसी नववर्षदिनीच असतो. फ्रेडी आणि त्याच्या साथिदारांनी (ब्रायन मे [गिटार], रॉजर टेलर [ड्रमर] आणि जॉन डिकन [बेस गिटार]) 'Queen’ बॅन्डच्या रूपाने जी काही कमाल केली, जी गाणी लिहिली ती आजही इतक्या वर्षांनी लोकप्रिय आहेत कारण ती अर्थपूर्ण आहेत. उगाच रक्त सळसळतंय म्हणून केलेला जल्लोश नाही. १९८५ च्या लाईव्ह एड कॉन्सर्ट मध्ये भले भले, तुल्यबळ बॅन्ड्स सादरीकरणासाठी असताना केवळ २० मिनिटांत आख्खी कॉन्सर्ट खिशात घालणं म्हणजे खेळ नाही पण ’क्वीन’ने तो चमत्कार दाखवला आणि त्या बॅन्डचा लीड सिंगर होता फ्रेडी मर्क्युरी.


राजकारण,धर्म ह्यावर चर्चा झडतात तेव्हा मी नेहमी म्हणते कि जन्माला येताना आपलं रूप, रंग, धर्म, जात, नागरिकत्व आणि नाव काय असावं ह्यावर आपला ताबा नसतो पण माणूस म्हणून आपण जेव्हा घडत असतो, तेव्हा आपल्या विचारसरणीवर आणि कर्तृत्वावर आपलं जे व्यक्तिमत्व तयार होत जातं, तीच आपली खरी ओळख असते.

मूळ भारतीय वंशाच्या झोराष्ट्रीयन (पारसी) धर्माच्या आईवडिलांच्या पोटी झांजिबार, टांझानियामध्ये जन्माला आलेला फरोख बलसारा, भारतात पांचगणीला शिक्षण घेऊन ’द हेक्टिक्स’ मध्ये पियानो वाजवणारा, दात पुढे असणारा ’बकी’ लंडनला गेल्यावर फ्रेडरिक मर्क्युरी असं नाव बदलून घेऊन पुढे ’फ्रेडी मर्क्युरी - द लेजिंड’ ह्या नावाने ओळखला जाईल हे खुद्द फ्रेडी मर्क्युरीचं स्वप्न होतं आणि त्याने ते पूर्ण केलं.


इतकं लिहिल्यावर वाटतंय कि फारच कमी लिहिलंय. त्याचे आईवडिल, बहिण, मित्रमैत्रीणी, इतर प्रसिद्ध गायकांसोबत त्याने गायलेली गाणी, त्याच्या कॉन्सर्टमधलं त्याचं सादरीकरण आणि हो, त्याच्या मांजरी यांच्याबद्दल मी काहीच लिहिलेलं नाही पण कितीही लिहिलं तरी ते अपूरंच असेल.

पुन्हा एकदा हॅपी बर्थडे, डार्लिंग. तू खरंच खूप जगायला हवं होतंस.

No comments:

Post a Comment