Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

भित्र्या लोकांची शूर वस्ती

0 comments

एखादा बेडर, मुळातच शूर असलेला माणूस क्रौर्याची परिसीमा गाठू शकत नाही कारण त्या बेडरपणात, शौर्यात तो स्वत:कडचं काहीतरी पणाला लावणार असतो. त्यात दुसऱ्याला इजा करण्याचा भाग आलाच तर नाईलाजाने येतो.

भित्र्या माणसाचं तसं नसतं. क्रौर्य हाच त्याचा शूरपणा असतो. त्याला क्रौर्य हे दुसऱ्याला इजा करण्यासाठीच वापरायचं असतं. एखाद्या भित्र्या माणसाच्या हातात जर सूत्र असली तर आपल्याला आयुष्यभर कुणालातरी, कशालातरी घाबरून रहावं लागल्याचं सगळं नैराश्य तो पुरेपूर आपल्या क्रौर्यकर्मांतून दाखवतो. सोशल नेटवर्किंग हा तर अशा भित्र्या लोकांना आपला शूरपणा दाखवण्यासाठी मिळालेला मोठ्ठा प्लॅटफॉर्म! इथे तुम्ही खऱ्या नावापेक्षा खोट्या नावाने दाखवलेला शूरपणा जास्त गाजतो, हे विशेष.

आपण काहीही बोललो तरी चालणार आहे कारण समोरची व्यक्ती काही आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधून बाहेर येऊन आपला गळा धरणार नाहीये, ही भावनाच किती धीर देऊन जाते अशा भित्र्यांना. आपल्याला काहीही इजा होऊ शकत नाही, हा विचार भल्याभल्यांना क्रूर बनवतो आणि मग कधी कळपाकळपाने, तर कधी एकट्याने सुरू होतो खेळ क्रौर्याचा. त्याला नाव दिलं जातं शौर्याचं.

आपल्या प्रतिक्रियेमुळे काय घडू शकतं, हे माहित असूनही शब्दांचे शर चालवले जातात. समोरचा घायाळ होतो आहे, असं दिसलं कि मग कळपात आणखी शूर योद्धे सामिल होतात. चेष्टा, खिल्ली, राजकीय मतभेद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशी बरीच नावं दिलेली आहेत ह्या क्रौर्याला. षडयंत्र रचली जातात, चक्रव्यूह रचली जातात. एखादा अभिमन्यू सापडला कि त्याचे लचके तोडायला सुरूवात होते.

ज्यांना सहन होत नाही, ते कायमचे निघून जातात. जे वाचतात, त्यांना कळून चुकतं कि सरळ वार उपयोगाचा नाही. मग ते सुद्धा वाट बघतात आणि योग्य वेळी विरोधकांचे क्रूरपणे लचके तोडत अपमानाचा बदला घेतात.

लाईक, कमेंट्सच्या पुरस्कारांची देवाण घेवाण होते. हल्ले, प्रतिहल्ल्यांचं चक्र सुरूच राहातं. भित्र्या लोकांच्या शूर वस्तीमध्ये रोज नवीन भर पडतच जाते.

No comments:

Post a comment