Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

कालाय तस्मै नमः

0 comments
मी सुरूवातीलाच ठरवलं होतं कि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्या शिक्षणाचा किंवा आपल्या वैयक्तिक खर्चाचा भार होता होईस्तो आईवडिलांवर टाकायचा नाही. त्यामुळे १२ वीची परिक्षा आटोपल्यावर टायपिंगसोबत जोडीला एखादा कोर्स केला कि चांगली नोकरी मिळेल, ह्या अपेक्षेने मी ऑफिस रिसेप्शनिस्ट डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. त्यात टेलिफोन ऑपरेटिंग, इलेक्ट्रॉनिक टायपिंग वगैरेही शिकवलं जाणार होतं. ही त्या काळातील गोष्ट आहे, जेव्हा कॉम्प्युटर हा शब्द फक्त ऐकून माहित होता. हजारात एखाद्याच्या घरात कॉम्प्युटर असायचा.

पूर्वी टि.व्ही.,टेलिफोन ज्याच्या घरात तो श्रीमंत असं समजलं जायचं. तसंच काहीसं कॉम्प्युटरच्या बाबतीत होतं. त्यामुळे कॉम्प्युटरचे कोर्स वगैरे तेव्हा नव्हते. टेलिफोन ऑपरेटिंगदेखील जुनं. इकडून जॅक उचलून तिकडे घाल, फ्लॅप पडला म्हणजे कुणाचा तरी कॉल आला वगैरे असं. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम नंतर आली. टेलिफोन ऑपरेटिंगचं मशीन म्हणजे एक अजस्त्र धूड असायचं. कॉल ट्रान्सफर करणे हे मोठं कौशल्याचं काम असायचं आणि ट्रंक कॉल बुक करणे हा एक वेगळा सोहळाच वाटायचा.

अशा काळात इलेक्ट्रॉनिक टायपिंग म्हणजे आपण यंव काहीतरी शिकतोय असं वाटायचं. गोदरेजच्या खटाखट टाईपरायटरच्या तुलनेत हे थोडं आकाराने मोठं पण देखणं मशीन असायचं. त्यात फाईल सेव्ह करता यायच्या. थेट टायपिंग करताना एखादे वेळेस चूक झालीच तर इरेझरचं बटण दाबायचं कि लगेच कर्र कर्र आवाज करत चुकीचं अक्षर खोडलं जायचं. झ्याक वाटायचं ते सगळं.

डिप्लोमा पूर्ण झाल्यावर अपेक्षेनुसार अगदी फटाफट काही नोकरी मिळाली नाही पण डिप्लोमामुळे नोकरी मिळायला मदत झाली हे नक्की. पुढच्या सहा महिन्यात आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगतीची कमालच केली होती. जिथे पहावं तिथे कॉम्प्युटर आले होते, लोक इमेल वगैरेची भाषा बोलायला लागले होते, इलेक्ट्रॉनिक टायपिंग विस्मृतीत जमा झालं होतं, टेलिफोन ऑपरेटिंग म्हणजे एकाच फोनवर दोन तीन नंबर्सच कॉंबिनेशन दाबून लाईन ट्रान्सफर करणे असं सोपं काम झालं होतं, "लोटसवर काम करायला शिका" असे सल्ले दिले जात होते, महागड्या फीचे कॉम्प्युटर कोर्स आले होते.

ह्या बदलामुळे एकीकडे बरंही वाटत होतं पण नैराश्यही तितकंच आलं होतं. ह्या बदललेल्या वातावरणात आपण नवीन गोष्टी शिकू शकलो नाही तर? आपल्याला ते जमलंच नाही तर? असे पराकोटीचे निराश विचार वारंवार मनात येत असतं. शेवटी नवीन ठिकाणी जिथे नोकरी मिळाली तिथे कॉम्प्युटरशी सामना झालाच. आपल्याला कॉम्प्युटर येत नसल्याचा प्रचंड न्यूनगंड आणि आपण जुनाट समजले जाऊ ह्या विचाराचा जबरदस्त ताण. पण मनात जी भिती होती, तसं काही घडलं नाही. माझी बॉस फार चांगली होती. कॉम्प्युटर हे नवीनच माध्यम असल्यामुळे तिने फावल्या वेळात मला कॉम्प्युटर शिकण्याची मुभा दिली.

ऑफिसमध्ये एकच असा मुलगा असा होता ज्याला कॉम्प्युटर येत असे. मला कॉम्प्युटरचा सी सुद्धा माहित नाही, असं मी म्हटल्यावर त्याने बिचाऱ्याने मला C.P.U. पासून सगळ्याची माहिती दिली. कॉम्प्युटरवर देखील मुख्य काम टायपिंग हेच असे त्यामुळे जुन्या मशीनवर शिकल्याचा फायदा झाला. कॉम्प्युटरच्या हलक्या बटणांवर आपोआपच स्पीड वाढत असे. माझ्या बॉसला माझं बटणांकडे न पाहता, वेगाने टायपिंग काणं फार आवडत असे. एक दिवस अचानक म्हणाली, "शॉर्ट हॅन्ड शिकून घे. खूप उपयोग होईल." माझे बाबादेखील मला हेच सांगत असत. पण कधी तेवढा वेळच मिळाला नाही आणि नंतर नोकरीसाठी शॉर्डहॅन्ड शिकावं अशी गरज उरली नव्हती. ते शिकायचं राहून गेलं ते गेलंच.

नंतर कॉम्प्युटरचाच बोलबाला होता. नवीन तंत्राचं टेलिफोन ऑपरेटिंग, कॉम्प्युटरच्या प्रणाली शिकता शिकता आपोआपच चांगल्या नोकऱ्या मिळत गेल्या. जिथे जिथे नोकरी केली, तिथे कॉम्प्युटरमधलं काही ना काही शिकून घेतलं. इंटरनेटचा वापर कसा करायचा ते स्वत:चं स्वत: शिकले. चुकता चुकता शिकल्यामुळे ह्या तंत्रज्ञानातील खाचा खोचा कळत गेल्या.

आज हे सगळं टाईप करताना ते दिवस आठवतात. स्वत:च्या घरात, स्वत:च्या कॉम्प्युटरवर टाईप करून, सर्वांशी संवाद साधता येईल असं तेव्हा कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा जर हे आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याचा ध्यास घेतला नसता तर आज हे ब्लॉगिंग वगैरे कधी जमलं नसतं. काळ कुणासाठीच थांबत नसतो. काळ बदलतो, त्यानुसार आपणही बदललं पाहिजे हेच खरं. प्रगतीचा तोच खरा मंत्र.

No comments:

Post a comment