Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

स्मृतीभ्रंश

0 comments
परवा दारावरची बेल कुणीतरी जिवाच्या आकांताने वाजवत होतं. मी धडपडून बघायला गेले. पाहाते तर आमच्याच कॉलनीत राहाणारे एक काका होते. कधी बेल वाजवत होते, कधी दारावर थाप देत होते. मी दरवाजा उघडल्यावर अत्यंत त्रासिक चेहेऱ्याने मला म्हणाले, "कधीपासून बेल वाजवतोय. एवढा वेळ काय करत होतीस?" मला अक्षरश: काहीही कळत नव्हतं. मी तापाच्या ग्लानीमध्येही काकांचं माझ्याकडे काय काम असू शकेल ह्याचा विचार करत होते. अचानक डोक्यात प्रकाश पडला! काकांना amnesia आहे - स्मृतीभ्रंश! आता त्यांचं वय ८० च्या आसपास आहे. ते बहुधा त्यांचं घर आणि बऱ्याच आठवणी विसरले होते फक्त आपलं घर ह्याच कॉलनीत आहे, हे ते विसरू शकले नव्हते. ते असे बरेचदा सगळं विसरतात मग थोडं-थोडं आठवतं हे माहित होतं मला.

बहुधा माझ्याप्रमाणेच त्यांनी अनेक घरांची बेल वाजवली होती, कुणीही त्यांना अपेक्षित प्रतिसाद दिला नसावा. त्यामुळे ते चिडचिडे झाले होते. मी काही न बोलता त्यांना त्यांच्या घराच्या गेटपर्यंत पोहोचवून आले. पण हेच ते आपलं घर हे त्यांना आठवत नव्हतं. मग मी बळेबळेच त्यांना गेटच्या आत घेऊन गेले आणि सांगितलं कि "तुम्ही इथेच राहाता. इथली बेल वाजवा, कुणीतरी दरवाजा उघडेल." हा सगळा प्रकार सुमारे ३ च्या आसपास घडला. मला तापामुळे फार वेळ उभं राहावत नव्हतं म्हणून त्यांना तिथे सोडून तशीच मागे फिरले. घरी येऊन पुन्हा झोपले ती थेट सात वाजता बावाजीने दारावरची बेल वाजवली तेव्हाच.

"अगं तू ह्या काकांना काही कामासाठी बोलावलं आहेस का? निदान आत तरी बोलवायचंस त्यांना. बाहेर का थांबवलंस?"

बावाजीचे हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली! मी पुन्हा धडपडत बाहेर जाऊन पाहिलं तर काका अतिशय गोंधळलेल्या आणि चिडलेल्या अवस्थेत आमच्या घराबाहेर चुळबुळत उभे होते. असे किती वेळ ते उभे असतील कुणास ठाऊक? मी बावाजीला म्हटलं, "आधी त्यांना त्यांच्या घरी सोडून ये आणि घरी म्हणजे... घरात कुणी आहे का बघ, नाहीतर त्यांच्या नातेवाईकांना फोन कर ताबडतोब." बावाजी बिचारा आज्ञा प्रमाण मानून जसा आला होता तसाच बाहेरच्या बाहेर गेला.

झालं होतं असं कि हे काका नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता कुणाला तरी भेटण्यासाठी बाहेर पडले होते, ते थेट रात्री ८ वाजता घरी परतणार होते. बरं, काकांना कुणी सोबत नको असतं. "माझा मी जाईन" असा त्यांचा हट्ट असतो. काका यापूर्वी असे अनेकदा बाहेर पडून पुन्हा घरी आलेले होते त्यामुळे घरातले लोकदेखील निर्धास्त होऊन बाहेर पडले होते पण कुणालाच असं वाटलं नाही कि काका अर्ध्या वाटेवरच सगळं विसरून जातील आणि पुन्हा मागे फिरतील. त्यांना खरोखर इतकंच आठवत होतं कि आपण कुठल्या एरियात राहातो. मात्र घर, नातेवाईकांचे चेहेरे वगैरे ते सर्व विसरले होते. जवळ फोन होता पण नावंच आठवत नाहीत तर कुणाला फोन करणार? सगळी कॉलनी फिरूनदेखील त्यांना घर आठवेना तेव्हा त्यानी दोन-तीण जणांच्या व माझ्या घराची बेल वाजवली होती. मी त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडून गेल्यावर त्यांनी तिथली बेल वाजवली पण घरात कुणी नव्हतंच तर दार उघडणार कोण? म्हणून ते पुन्हा माझ्या घराबाहेर येऊन उभे होते. हेच आपलं घर अशी त्यांना खात्री वाटत होती.

बावाजीने त्यांच्या जवळच्या किल्लीने घर उघडून दिलं. नातेवाईकांना फोन केला. काकांना घरात बसवून पाणी वगैरे देऊन आला. घरात गेल्यावर त्यांना घर ओळखीचं वाटलं. नातेवाईकांपैकी दोन जण ताबडतोब येत होते म्हणून काळजीचं कारण नव्हतं. पण मला मात्र अपराधी वाटत राहिलं. मी वेळीच त्यांच्या मोबाईलमधून त्यांच्या नातेवाईकांना फोन केला असता तर त्यांना असं तीन-चार तास ताटकळावं लागलं नसतं. साध्या गोष्टी चटकन आठवल्या नाहीतर आपल्याला किती अस्वस्थ वाटतं. काका त्यांचं घर, नातेवाईक सगळंच विसरले होते. किती अस्वस्थ झाले असतील ते?

No comments:

Post a comment