Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

बालक पालक

0 comments

मागे एका कार्यक्रमाला गेले होते, तेव्हाचा अनुभव दिव्य होता.

पालक कुठेतरी खुर्च्यांवर बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होते. त्यांच्या दोन लहान मुली यूट्यूबच्या व्हिडीओत मांजर कसं पायऱ्यांवरून घरंगळत जातं, त्याचं प्रात्याक्षिक करत होत्या. त्यांचा लहान भाऊ हातात सॉफ्ट टॉय धरून दुसऱ्या जिन्यावरून उलट्या पायऱ्या चढत होता. वर पोहोचला कि ते खेळणं खाली भिरकावून द्यायचं आणि स्वत:ही धडाधड जिने उतरत खाली जायचं. मग तीच कृती, त्याच क्रमाने पुन्हा पुन्हा करायची असं चाललं होतं.

मध्यंतरामध्ये ही पोरं बाहेर पळाली.

मग पित्याने मातेला विचारलं, "आपला मुलगा कुठे आहे?" त्यावर ती माता तितक्याच ईझमध्ये वदली, "कै म्हैत! असेल कुठेतरी."

पित्यालाही त्या उत्तराचं काही वाटलं नाही. मुलींबद्दल त्याने का विचारलं नसावं कुणास ठाऊक?

यथावकाश त्यांचा सुपुत्र हातातल्या सॉफ्ट टॉयची शेपटी धरून त्याला फरफटवत थेटरात आणता झाला. दोन्ही कन्या अद्याप बाहेरच होत्या. त्याचं पालकांनाही नवल वाटलं नाही.

थोड्या वेळाने बाहेर एक चिमुकली किंकाळी ऐकू आली. सर्वांनी बाहेर मान वळवून पाहिलं तर थेटराचा रखवालदार दोन्ही मुलींना दोन हातात घट्ट धरून पालकांच्या हवाली करण्यासाठी येताना दिसला. दोघी मुली पालकांना पाहून वारेमाप किंचाळू लागल्या. त्यातला लहानुलीने सिक्युरिटीवाल्याकडे बोट दाखवून म्हटलं, "ह्याने मला मारलं."

तो रखवालदार आणखी चिडला आणि पालकांना म्हणाला, "सांभाळा, रस्त्यावर चालल्या होत्या दोघी."

माता-पित्याच्या चेहेऱ्यावर तेच निर्विकार भाव. त्यांना रखवालदाराने मुलीला मारल्याचंही काही वाटलं नाही आणि आपल्या मुली रस्त्यावर जाणार होत्या याचंही काही वाटलं नाही. रखवालदाराला कुणी थॅक्स म्हणत नसतंच.

मध्यंतर संपलं. कार्यक्रम सुरू झाला. पोरी एका जिन्यावर पुन्हा घरंगळू लागल्या. पोरगा दुसऱ्या जिन्यावर पुन्हा उलट्या पायऱ्या चढू लागला.

सॉफ्ट टॉय बहुधा मातापित्यांनी सांभाळलं असावं. महागातलं होतं ना ते!

No comments:

Post a Comment