19 June 2017

अवघा रंग एक झाला


घरी खत तयार करण्याचं ठरवलं तेव्हा मनात अनेक शंका होत्या. खूप दुर्गंधी येईल का? अळ्या पडल्या तर? माश्या आल्या तर? खत तयार झालंच नाही तर? कारण प्रथमच हे दिव्य करत होते आणि हिरवा कचरा असला तरी थोडाफार आंबूळ वास यायचा. एखादी माशी घरात दिसली तरी जीव कासावीस व्हायचा.

साठवलेल्या त्या कचऱ्यावर कापसासारखी पांढरट बुरशी आलेली होती. ते चांगलं असतं म्हणे पण बघताना मन शहारत होतं. खत तयार होणार नाही ह्या शक्यतेकडे मनाचा कल जाऊ लागला. थोडं निराशही वाटू लागलं. वाटताना अगदी क्षुल्लक गोष्ट वाटत असली तर घरच्या घरी खत तयार करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मनातली ही विचारांची उलथापालथ स्वत:पुरतीच ठेवून दिवसभर कोऱ्या चेहेऱ्याने घरात वावरायचं हे सोपं काम नाही. कामातून थोडा जरी रिकामा वेळ मिळाला तरी विचार फक्त त्या डब्यात साठवलेल्या कचऱ्याचाच! ’उद्या आपल्यालाच ह्या कचऱ्यामुळे काही अ‍ॅलर्जी आली तर?’ असंदेखील वाटून गेलं होतपण ’काहीही करून घरात खत तयार करायचंच’ ह्या अट्टहासापायी मी संयम ठेवून होते. नाहीतर तो कचऱ्याचा लगदा मी केव्हाच फेकून दिला असता.

खत तयार करण्याच्या शेवटच्या प्रक्रियेमध्ये मातीचे थर देतानाही मनात विचार येत होते कि ह्या हिरव्या कचऱ्याचं मातीत कसं काय रूपांतर होईल? ही भाज्यांची देठं, फळांची सालं हे सगळं १५ दिवसांत विघटीत होईल? समजा, आपण वरून मिसळलेल्या मातीलासुद्धा तोच आंबूळ वास येऊ लागला तर ती माती फेकून द्यावी लागेल का? आंबूळ वासामुळे शेजाऱ्यांना उपद्रव झाला तर?

प्रश्न खूप होते पण उत्तरासाठी शेवटची प्रक्रिया पूर्ण व्हायला द्याप १५ दिवस वाट पहावी लागणार होती. रोज एक-एक दिवस मोजून काढला मी.

१५ दिवसांनंतर सकाळी, सकाळी साशंक मनाने त्या प्लास्टिकच्या टोपलीवरचं झाकण काढून आत डोकावून पाहिलं तर काय आश्चर्य! त्या आंबूळ वासाचा कुठे मागमूसही नव्हता. मी अविश्वासाने सगळे थर खाली-वर ढवळून झाले पण मी साठवला होता तो पांढरट बुरशी आलेला कचरा कुठेच सापडला नाही. केवळ माती आणि मृद्गंध! १५ दिवसांच्या अवधीत सगळं काही मृण्मय होऊन गेलं होतं.

निसर्गाची ती किमया पाहून आपोआप हात जोडले गेले. सगळी निसर्गाची कृपा पण त्यादिवशी माझा आत्मविश्वास दुणावला.

आपलं आणि परमेश्वराचं नातंदेखील असंच असतं ना! आपल्यात काहीही गुणदोष असू देत, एकदा परमेश्वराला समर्पित झालो कि अंतरंगी, बाह्यरंगी उरतो तो केवळ श्रीरंग!

No comments:

Post a Comment