Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

विश्वास

4 comments
टि.व्ही.वर दुपारी पाहिलेल्या एका प्रादेशिक चित्रपटाची ही कथा. बंगाली चित्रपट. नाव आठवत नाही.

एक छोटासा मुलगा. त्याला आई असते, बाबा नसतात. गावापुढे लागणारं जंगल ओलांडून तो दुसऱ्या गावात शाळेत जायला तयार होत असतो. पण त्याला जंगलातून जाण्याची भिती वाटत असते. त्याची आई त्याला म्हणते, "काळजी करू नकोस, कृष्ण भेटेल रानात. तो शाळेपर्यंत सोबत करेल तुला." आईच्या तेवढ्या आश्वासनावर हा छोटू विश्वास ठेवून रानाचा रस्ता धरतो. पण काय आश्चर्य! रानात खरोखरच त्याला एक त्याच्या वयाचा सवंगडी भेटतो. कृष्णच असतं त्याचं नाव.

छोटू घरी आल्यावर आईला सांगतो, "आई, तू म्हणालीस तसा खरंच कृष्ण भेटला गं रानात. शाळेपर्यंत सोबत केली त्याने मला." आता आई चकित कि कोण भेटलं ह्याला? मग तिला वाटलं कि असेल कुणीतरी जंगलात राहाणाऱ्याचा पोर. ती छोटूला त्याच्यापासून जपून राहायला सांगते. पण छोटू रोज घरी आल्यावर आईला कृष्णाचे एक-एक किस्से सांगतो. कृष्ण कसा त्याच्याशी बोलतो, छोटू आपल्या बाबांसाठी रडल्यावर कसं त्याचं सांत्वन करतो. हा कृष्ण नावाचा मुलगा खरंच आपल्या मुलाचा छान मित्र आहे हे पाहून आईलाही बरं वाटतं.

मग एके दिवशी आई घरी कसलीतरी पूजा करते. गावभोजन घालते. छोटू म्हणतो, "आई, सर्वांना बोलावलंस. मग मी कृष्णाला बोलावू का?" आई म्हणते बोलाव. छोटूच्या बोलावण्यावरून कृष्ण छोटूच्या घरी येतो. आई पहिल्यांदाच कृष्णाला पहाते पण तिला कृष्ण आवडतो.

आई एवढ्या लोकांना बोलावते खरं पण आयत्या वेळेस दही संपून जातं. तिला वाईट वाटतं कि आपण सर्वांना मनासारखं भोजन देऊ शकत नाही. पण कृष्ण म्हणतो, "माई, तुझं दह्याचं मडकं तर भरलेलं आहे. जा, बघ जा." आई स्वयंपाकघरात जाऊन पाहते, तर खरंच मडकं भरलेलं असतं. ती ते मडकं दुसऱ्या भांड्यात उपडं करते. पुन्हा मडकं भरलेलंच. असं करता, करता सर्व गावाला पुरेल इतकं दही तिला मिळतं. ती आश्चर्य आणि भितीने कृष्णाकडे पाहाते.

कृष्ण म्हणतो, "माई, किती विश्वासाने तू तुझ्या मुलाला माझ्या भरवश्यावर त्या निबिड जंगलात पाठवलंस. मग मी तुला ह्या गोष्टीसाठी निराश होऊ देईन का?"

4 comments:

 1. अत्यंत सुंदर आणि आशयपूर्ण शब्दांकन 👌👌👌👌

  ReplyDelete
 2. ही गोष्ट माहित होती. तू छान मांडलेस. पाहायला हवी :)

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद. मीही तो चित्रपट शोधतेय. सापडला तर तुला कळवते.

   Delete