काल सिनेमागल्ली फेसबुक ग्रुपमध्ये चेकमेटचा रिव्ह्यू पाहिला आणि ह्या सिनेमासाठी डबिंग केलेला दिवस आठवला. ह्यातील गर्दीची दृश्यं आणि वैयक्तिक दृश्यांना आवाज देण्यासाठी डबिंग आर्टिस्टची जी टीम बोलावली होती, त्यामध्ये मीही होते. कसला भन्नाट दिवस होता तो.
सगळा चित्रपट नाही पहाता आला, पण आवाज देण्यासाठी म्हणून जितकी दृश्यं पाहिली गेली ती पाहून हा सिनेमा कधी थिएटरला येतोय ह्याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यावेळेस मी BPO मध्ये काम करत असल्याने अमेरिकन इंग्लिश उच्चारांचा बऱ्यापैकी सराव होता म्हणून त्यातील परदेशी बाईला आवाज देण्याचं काम माझ्याकडे आलं. त्याचसोबत एका वृत्तनिवेदिकेचं दृश्य होतं, तिथेही माझा आवाज चपखल बसला म्हणून तेही दृश्य मी केलं. त्याचसोबत गर्दीची इतर दृश्यंही केली.

डबिंग स्टुडिओत ए.सी. मुळे गार वाटतं पण सकाळी जेव्हा स्टुडिओत जाण्यासाठी घराबाहेर पडले तेव्हा बाहेर प्रचंड ऊन होतं. त्या नादात शाल सोबत घेण्याचं लक्षात आलं नाही. नंतर स्टुडिओत गेल्यावर पाहिलं तर आमचे सगळेच सोबती ऊन होतं म्हणून जॅकेट, शाल काही न घेताच आले होते.
आमच्या गप्पांचा आवाज गोंगाटाच्या पातळीवर जाऊ लागला तेव्हा कोणीतरी येऊन आम्हाला दटावून गेलं, "ए, श्श! बाजूच्या स्टुडिओत लकी अली गाण्याचं रेकॉर्डिंग करतोय. तिकडे आवाज जाता कामा नये." दबक्या आवाजात गप्पा सुरू झाल्या. लकी अलीला पाहिलंही नव्हतं पण आम्हाला उगीच भारी वाटू लागलं कि लकी अलीच्या बाजूच्या स्टुडिओत आम्ही डबिंग करतोय.
नंतर जेव्हा डबिंगला सुरूवात झाली तेव्हा थंडीने अक्षरश: काकडून गेलो. एकामागून एक वाक्यं होती, त्यामुळे बाहेर थांबणं शक्य नव्हतं. ए.सी.चा गारवा हाडांपर्यंत पोहोचला होता. आमच्या अवस्थेवर आम्हीच हसत होतो. शाल न आणल्याचा पश्चात्ताप व्हायला लागला होता. अंगावर पांघरायला काहीतरी हवं होतं. शेवटी तिथे एक वर्तमानपत्र पडलं होतं. त्याचे कागद आम्ही ए.सी.चा गारवा लागणार नाही अश्या बेताने, चिमटीत धरून बसलो होतो. डबिंगचं पहिलं सत्र संपलं तेव्हा थंडीने पोटातल्या कावळ्यांना कोकलायला संधी दिल्याचं लक्षात आलं.
बाहेर बाकावर बसून सॅन्डविचेस खाता-खाता पुन्हा गप्पा सुरू झाल्या. पुन्हा कोणीतरी ओरडून गेलं, "अरे, हळू बोला रे! तो लकी अली बाहेर येईल रागावून." आमचा व्हॉल्यूम पुन्हा खाली आणि पुढच्या क्षणाला त्या दुसऱ्या स्टुडिओचा दरवाजा उघडला गेला.
दारात लकी अली उभा!
आधीच तो उंच, त्या आम्ही ज्या बाकावर बसलो होतो, तो ठेंगणा होता. त्यामुळे लकी अली ताडमाड दिसत होता. त्याला पाहून कोणाच्या तोंडात सॅंडविचचा तुकडा तसाच, कोणाचा आ वासलेला, कोणी आता हा ओरडणार आपल्याला म्हणून आंवढा गिळतंय, कोणी लकी अली दिसला म्हणून झालेला आनंद चेहेऱ्यावर अत्यंत बावळट भावातून व्यक्त करतंय (मीही त्यातच असणार) अशी सगळ्यांची भावावस्था असताना तो सर्वांकडे पाहून एकदम गोड हसला.
"हाय! हॅलो! हाऊ आर यू?" असं सगळ्यांकडे पाहून बोलत, मानेने अभिवादन करून तो पुन्हा हसला. जणू तो आम्हाला वर्षानुवर्षे ओळखत असावा.
हा, ह् ह, हाय, हाय, हॅलो... आम्ही काही नीट तोंडातून शब्द बाहेर काढेपर्यंत तो कॉरीडॉरमधून चालत निघूनही गेला.
तो निघून गेल्यानंतरही एक मिनिट आम्ही समाधीत होतो. नंतर स्वत:च्या बावळेपणा आठवून हसू आवरेना. पुढच्या डबिंगच्या सत्रात गप्पा मारण्यासाठी हा किस्सा पुरून उरला. लकी अलीची गाणीसुद्धा गुणगुणून झाली. डबिंग आटोपल्यावर चेकमेट सिनेमातली रेशम टिपणीसची एन्ट्री दोनदा बघितली. बाय गो वर नाच (हे बहुधा ’रिंगा रिंगा’) च्या वेळचं असावं) आणि सोनाली खरे मधुरा वेलणकरला ज्या नाचाच्या स्टेप्स करून दाखवते त्या करून बघितल्या.
धमाल केली होती.