Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

तुम्ही वाचाल का?

0 comments
पूर्वी असा एक प्रकार असायचा कि तुम्ही वर्तमानपत्रातील एखादी बातमी शेअर केलीत कि तुम्हाला सांगण्यात यायचं - "वर्तमानपत्रात प्रकाशित झाली किंवा वृत्तवाहिनीवर दाखवली गेली म्हणजे ती बातमी पूर्ण खरी असेलच असं नाही. समोर आलेल्या प्रत्येक सत्याला निरनिराळे पैलू असतात. तेही आपण अभ्यासले पाहिजेत." ते खरंही होतं. अनुभवाअंती ते पटलं होतं.

आता त्याच्याच जोडीला असं म्हणावंसं वाटतं कि आपल्या आवडत्या, आपण फॉलो करत असलेल्या किंवा आपलं श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तीने सोशल मिडीयावर एखाद्या गोष्टीबद्दल मत मांडलं तर ते सार्वजनिकरित्या Share करण्यापूर्वी त्यात किती तथ्य आहे, सत्याचा अंश कितपत आहे हे आपण स्वत: पडताळून Share केलं तर अनेक गैरसमज परस्पर टाळता येतील. ‘रेडीमेड’ माहिती मिळविण्यापेक्षा स्वत: शोधाशोध केल्यामुळे एका चौकटीबद्ध मतापलिकडे आणखी बऱ्याच गोष्टी जाणून घेता येतात. शिवाय, ज्यांनी चुकीची माहिती मूलत: Share केली त्या आपल्या ‘सेलिब्रिटी’लाही संभाव्य  Trolling पासून वाचवता येईल.

सध्या परिस्थिती अशी आहे कि एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने मत मांडलं कि त्याची शहानिशा न करता, बेधडक ते शेअर करायचं. साथीला आपलीही दोन वाक्यांची पुस्ती जोडायची किंवा आभार प्रदर्शनात्मक एखादी ओळ लिहायची. मात्र त्या मताच्या अनुषंगाने जी कोणी दुसरी व्यक्ती योग्य मत मांडेल, सत्य समोर आणेल त्या व्यक्तीची गणना आपल्या शत्रूपक्षात करायची किंवा अगदीच अहिंसात्मक निषेध म्हणजे त्यांच्या वक्तव्याकडे सरळ-सरळ दुर्लक्ष करायचं.

आपल्या आवडत्या व्यक्तीचं मत Share करुन आपण तिच्यावर दाखवलेला विश्वास, त्यामुळे आपण संपादन केलेली तिची मर्जी, आपला तिच्या खास गोटात झालेला समावेश, त्यातून वाढलेलं मित्र-वर्तुळ ह्या सगळ्या गुंतवणूकीची एका व्यक्तीच्या लहानशा Comment मुळे एका झटक्यात मोडतोड व्हावी हे कुणालाही आवडणार नाही पण चुकीच्या माहितीवर आधारलेली गृहितकं आपल्याला कितपत, कुठवर साथ देऊ शकतील?

हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीची एक पोस्ट Share केली गेल्यामुळे वाचनात आली. अत्यंत चुकीची माहिती रेटून सांगण्यात आली होती. ही व्यक्ती माझ्या फ्रेन्डलिस्टमध्ये नसल्यामुळे बहुधा मला त्यांच्या पोस्टवर कमेंट करता येईना. तरीही मी एका फॉरवर्ड पोस्टवर कमेंट दिली होती पण तिथे मला अर्थातच कोणत्याही प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. दुर्दैवाची बाब ही कि ती चुकीची पोस्ट माझ्या फ्रेन्डलिस्टमधल्या अनेक व्यक्तींनी ‘the unknown truth, अपरिचित माहिती' च्या नावाखाली शेअर केली होती. शेअरींगची संख्या एवढी मोठी होती कि प्रत्येक ठिकाणी कमेंट करुन सांगणं अशक्य होतं.

आता मूळ पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीशी माझं एक रुपयाचं देण-घेणं, वाद-विवाद नाहीत पण हल्ली असा एक समज निर्माण झालेला आहे कि पोस्टमधील विचाराला विरोध केलात म्हणजे तुम्ही त्या पोस्टकर्त्यावरच खुन्नस धरुन असता. विचारधारेपुरता विरोध करता येतो हे अजून लोकांना मान्य होत नाही. त्यामुळे नामोल्लेख, पोस्टचा विषय हे टाळून फक्त मत मांडलं आहे.

आपण जर स्वत:ला सेलिब्रिटी समजत असू किंवा सेलिब्रिटी म्हणून गणले जात असू तर सेलिब्रिटी म्हणून आपलंही समाजाप्रती  हे उत्तरदायित्त्व आहे कि योग्य, सत्य, तथ्यपूर्ण आणि सप्रमाण माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. गैरसमजांना छेद देऊन डोळ्यांत अंजन घालणारे, आपल्या Followersना अंतर्मुख व्हायला लावणारे विचारदेखील आपल्याला त्या माहितीच्या आधारे मांडता आले पाहिजेत. 

आपल्या जनतेला जे आवडतं तेवढंच फक्त सांगायचं असेल, तर सत्य सांगितल्यामुळे आपल्या अनुयायांचा तात्पुरता रोषही सहन करण्याएवढं बळ आपल्या अंगी नाही म्हणून आपण केवळ अनुयायांचं तुष्टीकरण करतो आहोत आणि स्वत:च्या प्रसिद्धीपलिकडे त्या पोस्टला काही अर्थ नाही हे सत्य आपण अप्रत्यक्षपणे स्विकारलेलं असतं.

‘ही अमूक गोष्ट फारशी कोणाला माहित नाही त्यामुळे ती सर्वांना सांगण्यात माझा नंबर पहिला असला पाहिजे’ ह्या अट्टहासातून तहान-भूक हरपून, नेटवरुन दोन-तीन साईट्सवरुन शोधलेले उतारे जोडून, दोन ओळींच्या Forwardचा जीव मोठा केला जातो. पण ज्या मूळ दोन ओळींच्या Forward साठी हा घाट घातला तीच माहिती आधी पडताळून घेण्याचे कष्ट घेतले तर पुढे जी गैरसमजांची मालिका तयार होणार असते त्याला तिथल्या तिथे आळा बसू शकेल.

No comments:

Post a Comment