Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

१६ डिसेंबर, एक अविस्मरणीय दिवस!

4 comments
सहसाच असा एखादा भारतीय सापडेल, ज्याला या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व ठाऊक नसेल. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तानने भारतापुढे शरणागती पत्करली. स्वतंत्र बांगला देशची निर्मिती झाली आणि तो दिवस आपण आज विजय दिन म्हणून साजरा करतो.


गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर भारतीय सेनेतर्फे आयोजित केला गेलेला विजय दिन सोहळा पाहाण्यासाठी मी देखील गेले होते. आपल्या सेनेचं कर्तृत्व पाहून खूप खूप अभिमान वाटला. गर्वाने मान आणखी ताठ झाली. असं वाटू लागलं की सगळ्या जगाला सांगावं, "कुणाची हिम्मत आहे मझ्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहाण्याची? पाहाताय ना आमचं सैन्य?"


एरव्ही गर्दीपासून लांब राहाणारी मी, तिथे जमलेल्या गर्दीचा एक भाग बनूनदेखील स्वत:ला खूप खूप स्पेशल समजत होते. मला वाटतं माझ्यासारख्याच भावना तिथे जमलेल्या इतर भारतीयांच्याही मनात दाटून आल्या असणार. कार्यक्रम संपल्यावर तिथे उपस्थित असलेल्या सैनिकांसोबत फोटो काढून घेण्यासाठी जो, तो धडपडत होता. ते सैनिकदेखील कौतुकाने फोटो काढून घेत होते. आमच्यापेक्षा खरंतर त्यांनाच जास्त आनंद होत होता. त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव जणू सांगत होते की आम्ही देशासाठी जे काही करतो, त्याची जाणीव आमच्या देशातल्या नागरिकांना आहे तर!

चित्रपट कलाकारांसोबत तर फोटो कधीही काढता येतात पण या खर्‍या हिरोंसोबत फोटो काढून घेण्याची दुर्मिळ संधी मला अजिबात गमवायची नव्हती. लगेच कॅमेरा एका व्यक्तीच्या हातात देऊन मी देखील उत्साहाने दोन सैनिकांसोबत फोटो काढून घेतला. घरी आल्यावर तो फोटो मी उत्साहाने किती जणांना दाखवला असेल कुणास ठाऊक! माझ्या अविस्मरणीय आठवणींमधे आणखी एका आठवणीची भर पडली होती.

पण गेल्या वर्षी याच दिवशी आणखी एक अशी घटना घडली की...मलाच काय, देशातल्या बहुसंख्य नागरिकांना ती बातमी ऐकून मानसिकरित्या छिन्नभिन्न झाल्यासारखं वाटलं असेल.


निर्भया... एक स्त्री असणं हाच तिचा दोष! तिच्याबाबतीत जे काही झालं ते अक्षम्य आहे. ज्या नराधमांनी ते हिडीस कृत्य केलं, त्यांना नरकातसुद्धा जागा मिळायची नाही. पण ज्याने निर्भयाच्या बाबतीत सर्वात जास्त क्रूरपणा दाखवला तो राक्षस साडेसतरा वर्षांचा असल्यामुळे त्याला अल्पवयीन समजायचं आणि शिक्षेत सूट द्यायची, हा मला स्त्रीत्वाचा अपमान वाटतो. या देशात जो कायदा परस्परसंमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी सोळा हे वय संमत करतो, तोच कायदा अठरा वर्षं पूर्ण व्हायला केवळ सहा महिने उरलेल्या नराधमाला नृशंस बलात्कार आणि खूनासारख्या अपराधासाठी केवळ तीन वर्षांची शिक्षा देतो? फक्त तीन??

ज्या दिवशी मी या देशात जन्म घेतल्याबद्दल, या देशाची नागरिक असल्याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजत होते, त्याच रात्री या देशाच्या राजधानीमधे माणूसकीला काळीमा फासणारं, स्त्रीजातीला असुरक्षित वाटायला लावणारं एक हिडीस कृत्य घडलं. त्यानंतर तशाच आशयाची कृत्यं वारंवर घडत राहीली. मुंबईला सुरक्षित शहर समजाणार्‍या आम्हा मुंबईकरांच्या भ्रमाचा भोपळा देखील फुटला.

परदेशातदेखील अशी कृत्यं नक्की घडत असतील. तशा बातम्या आपण वाचतोदेखील. पण भारत या देशाबद्दल इतर देशांच्या मनात काय भावना आहेत, हे देखील आपल्याला माहित आहे. आपल्या देशातील संस्कृती, धर्म, अध्यात्म याची महती केव्हाच सातासमुद्रापलिकडे पोहोचली आहे. म्हणूनच विचार आणि संस्कारांनी समृद्ध असलेल्या या देशामधे एका स्त्रीवर क्रूर पद्धतीत स्त्रीवर अत्याचार व्हावेत याची मला एक भारतीय म्हणून खंत वाटते. इतर देशांमधे जेव्हा असं काही होतं, तेव्हा तिथल्या संस्कृतीचा तो परिणाम असावा असं म्हणायला आपण मोकळे होतो. पण आपल्या देशात परस्त्रीला माता, भगिनी मानण्याची संस्कृती आहे. मग काय झालं त्या संस्कृतीचं? स्वत:चं आधुनिकीकरण करता करता आपण संस्कृतीचा बळी दिलाय की काय? की आपल्याच संस्कृतीमधील काही गोष्टी आपल्या विचारांना कमकुवत बनवू लागल्या आहेत? पुरूषप्रधान संस्कृतीचा पुरस्कार करता करता आपण पुरूषांना स्त्रियांचा आदर करायचा असतो, हेच शिकवायला विसरून गेलो आहोत का? की संस्कार आणि संस्कृती ही फक्त स्त्रियांनी सांभाळण्याची जबाबदारी आहे, असं पुरूषांनीच गृहीत धरलं आहे?

१६ डिसेंबर हा दिवस मला आता दोन निरनिराळ्या घटनांमुळे लक्षात राहातो. फरक इतकाच की एका घटनेमुळे मला देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्न पडत नाहीत आणि दुसर्‍या घटनेमुळे देशांतर्गत स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न पडतात.

यासारखंच आणखी काही:
The challenge of every day

अद्ययावत: १६ डिसेंबर २०१३, माध्यान्ह - १:३०

निर्भया...तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचं नाव जगाला कळावं अशी इच्छा जरूर व्यक्त केली होती पण त्यांनी तशी परवानगी दिली नव्हती, अशा आशयाची बातमी देखील बर्‍याच ठिकाणी प्रकशित झाली होती. (बातम्यांमधील आशय असा होता की बलात्कारविरोधी कडक कायदा बनवताना आपल्या मुलीचं नाव त्या कायद्याला देण्यात तिच्या वडिलांना काही अडचण नव्हती पण उघडपणे वर्तमानपत्रांमधून तिच्या खर्‍या नावाचा डंका पिटला जाणं त्यांना मान्य नव्हतं.) कदाचित पत्रकारांनी घाई केली असेल. त्यांची इच्छा नसताना जर तिचं नाव जाहिर केलं गेलं नसेल तर तिचं नाव घेऊन त्यांना अप्रत्यक्षपणे त्रास देण्यात काय अर्थ आहे? शिवाय तिच्या खर्‍या नावाने केसचा उल्लेख केला तर बर्‍याच जणांना क्ल्यू लागत नाही म्हणून निर्भया म्हणायचं. तिचं नाव घेण्यामागचा उद्देश चांगलाच आहे. तिचं नाव घेतल्याने संवेदना तीव्र होत नाहीत की नाव न घेतल्याने बधीर होत नाहीत फक्त आपल्या संवेदना तिच्या कुटुंबियांना आणखीन दु:खी तर करत नाहीत ना, एवढं पहायचं. एवढं आपण नक्कीच करू शकतो.

4 comments:

  1. can u writ this in hindi.... nic blog - Vivek Budhwa

    ReplyDelete
  2. can u guide me in writing blogs.This is my blog site http://pavitrawells.blogspot.com/

    ReplyDelete
  3. Hello Can guide me how to write blog i have been writing since 6 months see my blog link & please let me know how to polish my blog..http://pavitrawells.blogspot.com/

    ReplyDelete